Join us

Rabbi Season: रब्बी पिकांनी शिवार बहरले; पोषक वातावरणाने उत्पादन वाढीची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 15:50 IST

Rabi Season: यंदाच्या रब्बी हंगामात मुबलक जलसाठा आणि पोषक वातावरणामुळे पेरणी क्षेत्रात ३५ हजार हेक्टरची वाढ झाली आहे. कोणत्या पिकांना पसंती मिळाली ते वाचूया सविस्तर.

बुलढाणा जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये मुबलक जलसाठा आणि पोषक वातावरण यामुळे यंदाच्या रब्बी हंगामात पेरणी क्षेत्रात ३५ हजार हेक्टरची वाढ झाली आहे. जिल्ह्यात एकूण ३ लाख ८१ हजार ७३५ हेक्टरवर रब्बीची (Rabbi) पेरणी झाली असून, त्यात हरभऱ्याची (Harbhara) सर्वाधिक पेरणी २ लाख ५६ हजार ३१९ हेक्टरवर झाली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा जास्त झालेल्या पावसामुळे भूजलस्तर वाढला असून, फेरभरण झाल्याने सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले.

ही स्थिती रब्बी हंगामाच्या (Rabbi Season) पेरणीसाठी अत्यंत पूरक ठरली. जिल्ह्यात बहुतांश महसूल मंडळांमध्ये दमदार पाऊस झाला. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला, तसेच तलाव आणि विहिरींमध्ये मुबलक पाणी साठले.

वाढलेल्या थंडीमुळेही रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण निर्माण झाले. याचा सकारात्मक परिणाम म्हणून, गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात तब्बल ३५ हजार हेक्टरने पेरणी क्षेत्र वाढले.

२.२५ लाख शेतकऱ्यांनी घेतले विमा संरक्षण

रब्बी हंगामात जिल्ह्यातील २ लाख २५ हजार ५३७ शेतकऱ्यांनी ३ लाख ६३ हजार ६८५ अर्ज भरले आहेत. यामुळे ३ लाख २२ हजार हेक्टरवरील पिकांना विमा (Crop Insurance) संरक्षण मिळाले आहे.

तेलबिया पिकांकडे दुर्लक्ष

रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात पेरणी झाली असली तरी तेलबिया पिकांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. तीळ, करडई, सूर्यफूल आणि जवस ही पिके जिल्ह्यात नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यंदा तिळाची केवळ ७२ हेक्टर, करडईची ६५९ हेक्टर आणि सूर्यफुलाची केवळ २७ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

हरभरा पिकाची सर्वाधिक पेरणी

सरासरी पेरणी क्षेत्र २ लाख २६ हजार ७१८ हेक्टर असून, यंदा प्रत्यक्ष ३ लाख ८१ हजार ७३५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरणी हरभऱ्याची आहे. ३५ हजार हेक्टरने या क्षेत्रात वाढ झाली आहे.

 १६८ टक्के पेरणी

जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या तुलनेत १६८ टक्के पेरणी झाली आहे. मागील वर्षी ही टक्केवारी १५२ टक्के होती. यंदा ३ लाख ६४ हजार ११० हेक्टरवर रब्बी हंगाम बहरला असून, उत्पादन वाढण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

पिकानुसार पेरणीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)

सूर्यफूल  २७
हरभरा २,५६,३१९
गहू ७७,६५१
मका  ३१,१७३
रब्बी ज्वारी १६,००४
तीळ७२
करडई ६५९

हे ही वाचा सविस्तर : Harbhara Market: नव्या हरभऱ्याला 'या' बाजारात इतका मिळाला दर वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्ररब्बीरब्बी हंगामपीकपीक विमाशेतकरीशेती