Join us
Daily Top 2Weekly Top 5

Rabi Crop Sowing : रब्बी हंगामात आत्तापर्यंत किती क्षेत्रावर झाल्या पेरण्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 20:21 IST

मागील पाच वर्षांच्या पेरणीची तुलना केली तर ६५ टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. येणाऱ्या दोन ते तीन आठवड्यामध्ये राज्यातील पेरण्या पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

Pune : राज्यातील रब्बी हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या असून राज्यातील निर्धारित क्षेत्राच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मागील पाच वर्षांच्या पेरणीची तुलना केली तर ६५ टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. येणाऱ्या दोन ते तीन आठवड्यामध्ये राज्यातील पेरण्या पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, राज्यात थंडी वाढली असून राज्यभरातील शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, राजमा आणि ज्वारीची पेरणी केली आहे. राज्यात मागील पाच वर्षातील पेरणी क्षेत्र हे ५३ लाख ९६ हजार हेक्टर एवढे असून मागील वर्षी केवळ २३ लाख ९९ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या. तर राज्यात आजपर्यंत एकूण ३५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. 

यंदाच्या पेरणी क्षेत्राची मागील पाच वर्षाच्या पेरणी क्षेत्राशी तुलना केली तर यावर्षी १४७ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तर मागच्या पाच वर्षाच्या पेरणी क्षेत्राशी तुलना केली तर ६५.२५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये सर्वांत जास्त म्हणजे १७ लाख १० हजार हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. तर रब्बी ज्वारीची पेरणी ही ११ लाख १५ हजार हेक्टरवर झाली आहे. 

त्यापाठोपाठ गव्हाची पेरणी ४ लाख ४२ हजार हेक्टरवर आणि मकाची पेरणी १ लाख ७८ हजार हेक्टरवर झाली आहे. एकूण रब्बी अन्नधान्यांचा विचार केला तर ३४ लाख ९४ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. 

रब्बी ज्वारी पिकासाठी पीक विमा भरण्याचा अंतिम दिनांक - ३० नोव्हेंबर २०२४गहू, हरभरा व कांदा पिकासाठी पीक विमा भरण्याचा अंतिम दिनांक - १५ डिसेंबर २०२४

टॅग्स :शेती क्षेत्रपेरणीलागवड, मशागत