शेतकरी खरेदी करीत असलेल्या बियाण्यांची संपूर्ण माहिती मिळावी, यासाठी बियाणे निर्मिती करणाऱ्या कंपनी आणि एजन्सीजसाठी यापुढे बियाण्यांच्या पाकिटावर क्यूआर कोड आणि बियाण्यांशी संबंधित माहिती नमूद करण्याचे निर्देश केंद्रीय कृषी मंत्रालयाने ११ एप्रिल रोजीच्या पत्रान्वये दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळणार आहे.
केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सीडनेट इंडिया पोर्टलचे उपायुक्त (गुण नियंत्रण) डॉ. दिलीप श्रीवास्तव यांच्या स्वाक्षरीने ११ एप्रिल रोजी जारी करण्यात आलेल्या पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, बियाण्यांशी संबंधित माहितीच्या प्रसारासाठी मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता देण्यात आली आहे.
माहितीची छापील प्रतही बियाण्याच्या पाकिटासह प्रदान करणे आवश्यक
• सर्व बियाणे विक्री करणाऱ्या एजन्सी, कंपन्यांनी प्रत्येक बियाण्याच्या पॅकेटवर एक क्यूआर कोड समाविष्ट करणे आवश्यक आहे. हा क्यूआर कोड स्थानिक भाषांमधील पद्धतींच्या शिफारस केलेल्या पॅकेजच्या माहितीशी जोडलेला असावा.
• शिवाय, या माहितीची छापील प्रतही बियाण्याच्या पाकिटासह प्रदान करणे आवश्यक आहे. तथापि, १०० ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या बियाण्यांच्या पाकिटांना छापील पत्रकाच्या आवश्यकतेतून सूट देण्यात आली आहे.
• अशा पॅकेटसाठी, क्यूआर कोडद्वारे माहिती प्रदान करणे पुरेसे असल्याने अशा पाकिटांवर माहितीची छापील प्रत आवश्यक नाही.
• सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक पावले उचलावित, असेही निर्देश पत्रान्वये देण्यात आले आहेत.