Pune : देशातील आणि राज्यातील डिजीटल तंत्रज्ञानावर आधारित कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी महाविद्यालय पुणे येथे अॅग्रीटेक हॅकेथॉनचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी फुले कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी दिली होती. त्यानंतर आता प्रत्यक्षपणे हॅकेथॉनच्या आयोजनाचे काम सुरू करण्यात आले आहे.
राज्यातील आणि देशातील AI तंत्रज्ञान, IoT आणि Machine Learning यांसारख्या डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करून तयार झालेले आणि प्रत्यक्षपणे शेतकऱ्यांना फायदा होत असलेल्या स्टार्टअपला प्रोत्साहन देणे, यांसारखे स्टार्टअप तयार होणे आणि तरूणांनी कृषी तंत्रज्ञानाकडे वळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असून पुणे कृषी महाविद्यालयाकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
कृषीच्या ७ वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या स्टार्टअपला या स्पर्धेमध्ये सामील करून घेण्यात येणार आहे. यामध्ये सामील होणाऱ्या स्टार्टअपचे तीन ते चार टप्प्यावर चाचणी होऊन निवड केली जाणार आहे. तर प्रत्येक सेक्टरमध्ये पहिल्या येणाऱ्या स्टार्टअपसाठी ५० लाखांचे बक्षीस असणार आहे. दुसऱ्या क्रमांकावरील स्टार्टअपला २५ लाखांचे बक्षीस असणार आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुणे कृषी तंत्रज्ञान हॅकेथॉनसाठी पुढाकार घेतला असून स्टार्टअपला देण्यात येणाऱ्या बक्षिसांची जवळपास ५ कोटी २५ लाखांपर्यंतची रक्कम ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिली जाणार असल्याची असल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये कृषी महाविद्यालय पुणे आणि कृषी विभागाच्या तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येणार असून सहभागी झालेल्या स्टार्टअपच्या निवडीसाठी या तज्ज्ञांची मोठी मदत होणार आहे.
कोणते सात क्षेत्र?१) जलसंधारण आणि मातीसंवर्धन२) कृषी यांत्रिकीकरण३) पीक संरक्षण (खते आणि कीटकनाशके)४) उर्जा५) पोस्ट हार्वेस्ट तंत्रज्ञान आणि वेस्ट मॅनेजमेंट६) कृषी अर्थशास्त्र७) यांव्यतिरिक्त...
वरील सात क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आणि डिजीटल तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांना फायदा देणारे स्टार्टअप या हॅकेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे देशभरातील स्टार्टअपला पुणे अॅग्रीटेक हॅकेथॉनमध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी लाभणार आहे.
कृषी तंत्रज्ञानाला चालना मिळण्यासाठी आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी आम्ही येणाऱ्या काळात हॅकेथॉनचे आयोजन करणार असून यामध्ये सरकारच्या कृषी क्षेत्राशी संलग्न असणाऱ्या विविध विभागांना सामील करून घेता येणार आहे.- जितेंद्र डुडी (जिल्हाधिकारी, पुणे)(रेसिड्यू फ्री कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना)
कृषी हॅकेथॉनचे आयोजन करण्याची जबाबदारी ही पुणे कृषी महाविद्यालयावर असून ही महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी संधी आहे. यातून विद्यार्थ्यांना नव्या गोष्टी, तंत्रज्ञान आणि कृषी व्यवसायाच्या बारीकसारीक गोष्टी शिकायला मिळणार आहेत. येणाऱ्या काही दिवसांत या कार्यक्रमाची रूपरेषा आणि वेळ आम्ही जाहीर करू.- डॉ. महानंद माने (सहयोगी अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय, पुणे)