Join us

Pune Agriculture Exhibition : पुणे शहराच्या मध्यभागी होत असलेल्या शाश्वत शेती प्रदर्शनाचे काय आहेत वैशिष्ट्ये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 18:48 IST

कृषी महाविद्यालयाने आज पत्रकार परिषद घेऊन प्रदर्शनाची रूपरेषा आणि यामध्ये घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा केली आहे.

Pune Agriculture Exhibition : पुणे शहराच्या मध्यभागी असलेल्या कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणावर महात्मा फुले कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, आत्मा विभाग, पुणे जिल्हा परिषद आणि उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये कमी रसायनांचा वापर करून तयार करण्यात आलेले प्रात्यक्षिक पिकांचे प्लॉटही पाहायला मिळणार असून या माध्यमातून पुणेकरांना शेतीमध्ये अन्नाची निर्मिती कशी केली जाते यासंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे. 

दरम्यान, कृषी महाविद्यालयाने आज पत्रकार परिषद घेऊन प्रदर्शनाची रूपरेषा आणि यामध्ये घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा केली आहे. कृषी महाविद्यालय पुणेचे सहयोगी प्राध्यापक डॉ. महानंद माने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उमेदच्या प्रकल्प संचालिका शालिनी कडू आणि महाविद्यालयाचे प्राध्यापक यावेळी उपस्थित होते. 

येणाऱ्या ६ मार्चपासून १० मार्चपर्यंत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून पुणेकरांना हे प्रदर्शन बघण्यासाठी फ्री/मोफत असणार आहे. यामध्ये शाळकरी मुलांनाही बघण्यासाठी आमंत्रित करण्यात आले असून जास्तीत जास्त पुणेकरांना आपल्या ताटातील अन्न शेतात कसे उगवते हे दाखवण्याचा हा प्रयत्न असणार आहे. दरम्यान, रेसिड्यू फ्री म्हणजेच रासायनिक अवशेषमुक्त अन्न खाण्यासंदर्भातही जनजागृती करण्यात येणार आहे. 

कृषी महाविद्यालयात असणाऱ्या पॉलिहाऊस तंत्रज्ञान, पॉलिहाऊसमधील पिकांची लागवड आणि व्यवस्थापन, पाण्यामुळे किंवा गाळामुळे चोपन जमिनीचे व्यवस्थापन, शेतीमधील ड्रेनेज सिस्टम, शेततळ्यातील मत्स्यपालन तंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी, सेंद्रीय निविष्ठा यांचा शेतीमध्ये वापर आणि तयार करण्याच्या पद्धती, सेंद्रीय निविष्ठांचे शेतीतील महत्त्व, गोआधारित शेती संस्कृती या सर्व गोष्टी या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. 

सावित्री जत्राजिल्हा परिषद आणि उमेद अभियानाच्या अंतर्गत असणाऱ्या महिला स्वयंसहाय्यता गटाचे स्टॉल्स या प्रदर्शनात असणार आहेत. यामध्ये महिलांच्या गटाने तयार केलेल्या विविध वस्तूंची आणि खाद्यपदार्थांची विक्री या ठिकाणी होणार आहे. ड्रोन दिदी योजनेंतर्गत ड्रोन मिळवलेल्या महिलांनाही या कार्यक्रमाला आयोजित करण्यात येणार असून इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 

शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजनप्रदर्शनाच्या पाचही दिवस शेतकऱ्यांसाठी विविध विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शेती, मूल्यसाखळी वाढ, निर्यात, पोल्ट्री व्यवसाय, डेअरी व्यवसाय, गोआधारित शेती, तंत्रज्ञानाधिरत शेती, सिंचन व्यवस्थापन, शेतीव्यवसाय आणि आरोग्य या विषयावर तज्ज्ञ आणि अनुभवी शेतकरी मार्गदर्शन करणार आहेत. 

कृषी तंत्रज्ञानशेती औजारे आणि शेतीसाठी लागणारे तंत्रज्ञान आणि यंत्रांसाठीही वेगळी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी तयार केलेल्या विविध जुगाडांचा सामावेश असणार आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी