Join us

Proso Millets : हवामान बदलानुकूल अन् कोरडवाहू पीक असलेल्या वरईचे 'हे' फायदे माहितीयेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 10:05 IST

Proso Milletsज्वारी, बाजरी, रागी किंवा नाचणी, सावा, वरई, कांगणी किंवा राळ, भगर, सामा किंवा कोराळे, कोद्रा हे प्रमुख भरडधान्ये आहेत. या भरडधान्यांपैकी 'वरई' या पिकाची सखोल माहिती जाणून घेऊयात.

मिलेट्स म्हणजेच भरडधान्ये किंवा तृणधान्यांचे मानवी आहारामध्ये खूप महत्त्व आहे. भारतातील लोकांचे पारंपारिक अन्न हेच होते. पण हरितक्रांतीनंतर आपल्याकडे गहू आणि तांदळाचे आहारातील प्रमाण वाढत गेले आणि भरडधान्याचे प्रमाण कमी होत गेले. २०२३ हे वर्ष सर्वांनी आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्ष म्हणून साजरे केले. त्यानंतर मिलेट्सचे महत्त्व पुन्हा जगाला कळाले. पण मिलेट्समध्ये असलेल्या ८ ते १० धान्यांची ओळख आपल्याला आहे का?

ज्वारी, बाजरी, रागी किंवा नाचणी, सावा, वरई, कांगणी किंवा राळ, भगर, सामा किंवा कोराळे, कोद्रा हे प्रमुख भरडधान्ये आहेत. या भरडधान्यांपैकी 'वरई' या पिकाची सखोल माहिती जाणून घेऊयात.

वरई (Proso Millets)

प्रोसो मिलेट (पॅनिकम मिलिसेम, चायनीज मिलेट, मराठीत वरई (वऱ्याचे तांदूळ) वरी व हिंदीत चिन या नावाने वरईला ओळखले जाते.)

* वरई किंवा वरी हे कोरडवाहू व डोंगराळ प्रदेशांमध्ये चक्री पीक घेण्यास उत्तम ठरते.* रोजच्या आहारात न्याहारी म्हणून वरीचे अधिक सेवन केले जाते.* हे खनिजे, पचनशील तंतुमय घटक, पॉलिफिनॉल्स, जीवनसत्वे (विटॅमिन) व प्रथिने यांनी समृध्द असल्यामुळे आरोग्यासाठी ते बहुगुणी ठरते.* हे ग्लुटेनमुक्त असल्यामुळे ग्लुटेनयुक्त आहाराचा त्रास असलेल्या लोकांसाठी आदर्श ठरते.* वरईमध्ये उच्च पातळीचे लेक्टिनिन असते त्यामुळे मेंदू विषयक आरोग्यासाठी ते उपयुक्त ठरते. ते नियासिन, बी कॉम्प्लेक्स, फॉलिक आम्ल यांसारख्या जीवनसत्वांनी व पोटॅशियम, कॅल्शियम व झिंक तसेच आवश्यक अमिनो आम्लांनी समृध्द असते. याचा ग्लायसेमिक निर्देशांक कमी असून ते टाईप २ मधुमेह असलेल्या मधुमेहींसाठी उत्तम अन्न ठरते.* वरईतील मानवी आरोग्याच्या दृष्टीने हितकारी लाभांव्यतिरिक्त पर्यावरणीय फायदेही खूप आहेत व हे हवामान बदलानुकूल पीक आहे.* वरई हे दुष्काळ व उष्णतेत तग धरुन राहणारे पीक आहे व सुमारे ३ महिन्यांच्या कमी अवधीच्या हंगामात येणारे पीक आहे. याच्या काही प्रकारांमध्ये जवळपास फक्त ६० दिवसांत धान्य निर्मितीची क्षमता आहे. यामुळे भारतातील पावसाची कमतरता असलेल्या कोरडवाहू जमिनीतील शेती प्रणालीमधील आश्वासक चक्री पीक बनले आहे.* मध्यप्रदेश, पूर्व उत्तरप्रदेश, बिहार, तामिळनाडू, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश व कर्नाटक येथे मोठ्या प्रमाणात वरीची लागवड केली जाते.

(माहिती संदर्भ - महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे)

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी