Join us

नववर्षातील नियोजन : ठेक्याने शेती देण्यावर भर, यांत्रिकीकरण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 12:51 PM

शेतमालाचे दर, सालगडाचे वाढलेले पगार, रासायनिक खताचे वाढलेले भाव, शेतीमध्ये वाढलेले यांत्रिकीकरण यामुळे ठेक्याने शेती देण्यावर अनेकांचा भर.

दरवर्षी खरीप हंगाम सुरू होताच खते, औषधी, कीटकनाशके, बी-बियाण्यांच्या किंमती, मजुरी, वाहतूक दरात वाढ होते. त्याप्रमाणे आपल्या पदरातही काही पडेल या आशेने शेतकरी कष्ट करून विविध पिकांचे उत्पादन घेतात. मात्र, शेतमाल विक्रीसाठी येईपर्यंत शेतमालाचे दर घसल्याचे पुढे येते.

अशी स्थिती सध्याही बाजारात दिसून येत असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. गुढी पाडव्याला शेतकरी नवीन वर्षाच्या शेती नियोजनाला लागत असून सालगडी, बैलजोडी खरेदीवर भर दिला जात असतो. यात आता शेतकऱ्यांचा शेती ठोक्याने देण्याकडे कल वाढला आहे.

शेतकरी नववर्षाला गुढीपाडव्याला आपल्या शेतीचे नियोजन करतो. सालगडाचे वाढलेले पगार, महागडे कीटकनाशक, फवारणी, वाढलेली बी बियाण्याचे भाव, रासायनिक खताचे वाढलेले भाव आणि त्यातच वाढलेली मजुरी व मजुरीसाठी करण्याचा खर्च, आदी बाबींचा विचार करून परिसरात शेतकरी आपली शेती ठोक्याकडे देण्याचा कल वाढला आहे.

तसेच खरीप आणि रब्बी त्यावेळी होणारी अवकाळी गारपीट यामुळे पिकावर होणारा परिणामामुळे तसेच पीक होणारी घट त्यातून निघणारी उत्पन्न हे अत्यंत अल्प झाल्याने परिसरातील शेतकरी चांगला दस्तावला असून आपली शेती ठोक्याने देण्याकडे कल वाढला आहे.

या वर्षात वाढले सालगड्याचे पगार

परिसरातील सालगड्याला वर्षाला एक लाख २५ हजार ते एक लाख ३० हजार रुपये मोजावे लागत आहेत. यंदा अवकाळी गारपीट, वादळी वाऱ्यामुळे उत्पन्नात मोठी घट झाली. शेतीत खर्चही मोठ्या प्रमाणात केला मात्र, आमदणी अठन्नी अन् खर्चा रुपया अशी गत शेतयऱ्यांची झाल्याची स्थिती ग्रामीण भागात पहायला मिळत आहे.

शेतमाल दरवाढीकडे शेतकऱ्यांचे लक्ष

यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. कापूस, तूर, सोयाबीन आदी पिकांना मोठा फटका बसला. दरम्यान यंदातही सोयाबीन, कापसाचे दर वाढून नुकसान भरपाई निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती.

मात्र, ते फोल ठरले. सोयाबीन ४ हजार ५०० प्रति क्विंटलवर येऊन ठेपले तर कापूस ८ हजारी पार होत नसल्याने येणाऱ्या हंगामात खर्च करावा की नाही, असा सवाल उपस्थित होत असून दरवाढीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

जनावरांची संख्या झाली कमी

दिवसेंदिवस शेतीसाठी यांत्रिकीकरणावर भर दिला जात आहे. ट्रॅक्टरव्दारे पेरणी, रोटावेटर, नांगरणी, कोळपणी आदी कामे केली जात असाने पशूची संख्या कमी झाली आहे. बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतल्याने जनावरांची संख्या घटत आहे.

टॅग्स :शेतीशेतकरीबाजारपीकदुष्काळ