Join us

Palas Flowers: वसंत ऋतूची चाहूल लागतच पळस फुलांनी शेतशिवार फुलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 11:34 IST

Palas Flowers : शिशिर ऋतूनंतर वसंत ऋतूची (Vasant) चाहूल लागली असून, पळस फुलांनी शेतशिवार फुलून निघाल्याने चैतन्यमय वातावरण पाहायला मिळत आहे. वाचा सविस्तर

शिशिर ऋतूनंतर वसंत ऋतूची (Vasant) चाहूल लागली असून, पळस फुलांनी शेतशिवार फुलून निघाल्याने चैतन्यमय वातावरण पाहायला मिळत आहे. वसंत ऋतू हा माघ आणि फाल्गुन या दोन महिन्यांत सुरू होतो. 'वसंत' मध्ये अनेक झाडांची पालवी झडू लागते. परंतु पळस मात्र दिमाखाने फुललेला पाहावयास  मिळतो.

वसंत पंचमीपासून (२ फेब्रुवारी) वसंतोत्सव सुरुवात झाली आहे. बदलत्या वातावरणात सकाळची हुडहुडणारी थंडी (Cold) आणि दुपारच्या उन्हाचा  (Hot) त्रास सुरू झाला आहे. सद्यःस्थितीत कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, हिंगोली आणि सेनगाव तालुक्यांतील डोंगराळ भागातील शेतशिवारात निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केल्याने पळसाच्या कोवळ्या फुलांनी डोंगररांगा केशरी झाल्या आहेत.

सद्य: स्थितीत पळसाची केशरी रंगाची फुले, पाने प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहेत. रंगपंचमीची चाहूल व शिमगा या सणाची आठवण पळसाची फुले करून देत आहेत. मुक्तहस्ते रंगांची उधळण करून वैशाखी पौर्णिमेच्या जणू चांदण्यात पळस केसरी, लाल रंग निसर्गाच्या नयनरूपात ओसंडून वाहत आहे. 

पूर्वी धूलिवंदन सण आला की, एकमेकांच्या अंगावर टाकण्यासाठी उपयोगात येणारा रंग बनवण्यासाठी पळसाच्या फुलांचा वापर केला जात असे. तसेच आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणूनही पळसाचा वापर होत असे.

काळ बदलला तरी महत्त्व कायम

* पूर्वी ग्रामीण भागात पळस पानांपासून मोठ्या प्रमाणात द्रोण आणि पत्रावळ्या बनवल्या जात असत.

* काळ बदलला असला तरी पळसाचे महत्त्व कमी झाले नसून आजही पळसाच्या पत्रावळी व द्रोण बाजारात मिळू लागली आहेत.

* खडकाळ भागात पळसाची झाडे लाल, केसरी आणि पिवळ्या अशा रंगांच्या फुलांनी लगडलेली दिसत आहेत.

* डोळ्यांना भुरळ घालणारा पळस सध्या कोवळ्या लुसलुशीत फुलांनी बहरला आहे.

* कळमनुरी तालुक्यातील डोंगराळ भाग, वारंगा, बाळापूर, डोंगरकडा, औंढा व सेनगाव तालुक्यांतील डोंगराळ भागातील शेतशिवारात व जंगल परिसरात पळस नटलेला दिसत आहे.

वसंत ऋतुला झाला प्रारंभ

या ऋतूतील सण म्हणजे वसंत पंचमी, गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती  आदी सण साजरे केले जातात.  

पळस दिसू लागला नटलेला...

थंडी ओसरायला लागली की, पानझडीने उघडी पडलेली वृक्ष नव्या पालवीचे लेणे अंगावर मिरवायला लागते. तेथूनच वसंताची चाहूल लागते. या वसंतात रंगाची उधळण करणारा रंगोत्सव सुरू होतो. शिशिरात बोडख्या झालेल्या शेताला केसरी, लाल रंगात न्हाऊ घालणारा पळस नटलेला चोहीकडे पाहण्यास मिळत आहे.

अनेक व्याधींवर गुणकारी पळसफुले विशेषतः मूत्रविकार, मुत्राश्मरी यासाठी पळस गुणकारी असून औषधी गुणधर्म असलेले झाड आहे. पळसाचे सर्वच भाग अनेक रोग आणि विकारांवर उपचार करण्यासाठी वापरले जातात.

लाल फुलांमुळे पळसाला 'फॉरेस्ट फायर' म्हणतात. आयुर्वेदात पळस एक शक्तिवर्धक म्हणून वापरला जातो. पळसामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरिअल, वेदनाशामक आणि अँटी-ट्युमर गुणधर्म आहेत. यामुळे मधुमेह नियंत्रित राहतो.  - डॉ. गजानन धाडवे, आयुर्वेद तज्ज्ञ, हिंगोली

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather News: तापमान वाढीला लागणार का 'ब्रेक'? IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रफुलशेतीफुलंशेतकरीशेती