कासवांबद्दल खूप ऐकलं होत, पण मी जे शिकले, या कासवांकडून ते मात्र माझ्यात जणू थिजलं आहे, इतकं ते मला महत्त्वाचं वाटतं. मला असं वाटतं की, निसर्गाचा खरा चमत्कार वेगवान जगण्यात नाही, तर हजारो मैल प्रवास करूनही दिशा न हरवण्यात आहे जसं हे समुद्री कासवं करतात. गुहागरला गेलेलो असताना हा अनुभव आला.
समुद्री कासव आयुष्याचा बहुतांश काळ समुद्रात घालवतात. पण अंडी घालण्याची वेळ आली की मादी कासव त्या किनाऱ्यावर परत येते जिथे ती स्वतः जन्मली होती. वैज्ञानिक संशोधनानुसार कासव पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा वापर करून दिशा ओळखतात. हजारो किलोमीटरचा प्रवास करूनही ती योग्य किनारा शोधतात - हे आजही निसर्गातील मोठं रहस्य मानलं जातं.
रात्रीच्या शांततेत मादी कासव किनाऱ्यावर येते. ती वाळूत खोल खड्डा खणते. साधारण ८० ते १२० अंडी घालते. तो खड्डा पुन्हा तिच्या चारही पायांनी वाळू उडवून झाकते आणि पुन्हा समुद्राकडे परत जाते. यानंतर आई कासव कधीच मागे वळून पाहात नाही. पुढची सगळी जबाबदारी निसर्गाची असते, असं म्हणतात. अशीही एक गोष्ट सांगितली जाते की, मादी कासव साधारण ४५ ते ५० दिवसांनी पुन्हा येते आणि मुलांना बघून परत जाते. पण मग ती जर परत येत असेल तर संशोधकांना नक्कीच समजले असते.
महाराष्ट्रात स्थानिक ग्रामस्थ आणि स्वयंसेवक मिळून कासव संरक्षणाची प्रेरणादायी चळवळ चालवत आहेत. त्यात कासवे किनाऱ्यावर आल्यानंतर अंडी घालताना त्यांना काही होऊ नये म्हणून जागे राहून पहारा देणे, कासवीण अंडी घालून जेव्हा समुद्राकडे परत फिरते तेव्हा ही मंडळी तेथून अतिशय काळजीपूर्वक ती अंडी काढतात. कारण अंडी हलली तर त्यातून पिल्लू बाहेर येत नाही. तिथून सरकारी कासव अंडी उबवणी केंद्रांमध्ये अंडी आणली जातात आणि पुन्हा तसाच खड्डा करून तेथे ठेवली जातात.
मानव आणि निसर्गाची सुंदर भागीदारी
• महाराष्ट्रातील वेळास आणि गुहागरसारख्या गावांनी दाखवून दिले आहे की, लोकसहभागाने निसर्ग वाचवता येतो. ग्रामस्थ अंडी सुरक्षित ठेवतात, पिल्ले समुद्रात सोडतात आणि पर्यावरणपूरक पर्यटनालाही चालना देतात.
• ही केवळ संवर्धनाची गोष्ट नाही तर निसर्गाशी नाते जपण्याची संस्कृती आहे. याशिवाय गोवा आणि ओडिशामधील स्थानिक स्वयंसेवक आणि ग्रामस्थही संशोधकांसोबत काम करून समुदाय आधारित संवर्धनाचे आदर्श मॉडेल उभे करीत आहेत.
जन्म होताच सुरू होतो कासवांचा जगण्याचा संघर्ष
• ४५ ते ६० दिवसांनी कासवाची पिल्ले अंड्यातून बाहेर येतात. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षण असतो. कारण त्यांना स्वतःच वाळूच्या खड्ड्यातून वरपर्यंत यायचे असते. यासाठी निसर्गाने त्यांना त्यांच्या नाकावर एक टोक दिलेले असते. त्याच्या साहाय्याने ते अंड्यातून बाहेर आले की, वाळूशी संघर्ष करून वर येतात. काही दिवसांनी हे टोक नाहीसे होते.
• त्यानंतर त्यांना समुद्रापर्यंत पोहोचायचे असते. त्यावेळी त्यांना अनेक शिकाऱ्यांचा धोका असतो. मोठे पक्षी, कावळे, घारी, मोठे खेकडे, कुत्री, मांजरी, कोल्हे इत्यादी या सगळ्यांना चुकवून तीन-चार दिवसांची ती बाळं समुद्राच्या दिशेने जातात. ती बरेचदा वाट चुकतात. आता संरक्षक असल्यामुळे त्यांना पुन्हा समुद्रात सोडले जाते.
• शेकडो पिल्लांपैकी फारच थोडी कासवे वाचतात आणि मोठी होतात. त्यातली मादी कासव पुन्हा त्याच किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी परत येतात. असे म्हणतात की, किनाऱ्यावरून समुद्रात जाताना त्यांच्या स्मरणात तेथील समुद्र किनारा कायमचा फिट्ट बसतो.
डॉ. आरती सूर्यवंशीफॅमिली थेरपिस्ट
हेही वाचा : मृत्युपत्र करावे की बक्षीसपत्र; नक्की फायद्याचे काय? जाणून घ्या सविस्तर
Web Summary : Female sea turtles return to their birth beaches to lay eggs. Conservation efforts by locals protect eggs, ensuring hatchlings reach the sea, continuing this ancient cycle. A heartwarming tale of nature and community.
Web Summary : मादा समुद्री कछुए अंडे देने के लिए अपने जन्मस्थान के समुद्र तटों पर लौटती हैं। स्थानीय लोगों के संरक्षण प्रयास अंडों की रक्षा करते हैं, जिससे बच्चे समुद्र तक पहुँचते हैं, इस प्राचीन चक्र को जारी रखते हैं। प्रकृति और समुदाय की एक दिल को छू लेने वाली कहानी।