Join us

New Zealand Grapes Export : न्यूझीलंडला बंद असलेली द्राक्ष निर्यात सुरू करण्यासाठी कृषी विभाग अन् अपेडाकडून प्रयत्न सुरू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 18:52 IST

सदर देशात द्राक्ष निर्यात सुरू करण्यासाठी फलोत्पादन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, निर्यात विषयक कार्यपद्धती व प्रोत्साहनामुळे गुणवत्ता पूर्ण उत्पादन होऊन निर्यात सुरू करण्याच्या अडचणीवर मात केली असल्याने न्यूझीलंड देशाकडून निर्यात सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी असे आवाहन संचालक फलोत्पादन डॉ. कैलास मोते यांनी केले.

Pune : भारताची द्राक्षे पहिल्यांदाच न्यूझीलंडला पाठवण्यासाठी महाराष्ट्राने प्रयत्न केले असून यासंदर्भात शिष्टमंडळासह अपेडा कार्यालय वाशी येथे दोन दिवसांपूर्वी म्हणजेच १७ फेब्रुवारी रोजी बैठक पार पडली आहे. यावेळी भारतामधून द्राक्षाची निर्यात न्यूझीलंडला होण्यासाठी पोषक चर्चा झाली आहे. 

दरम्यान, राज्याचे फलोत्पादन संचालक कैलास मोते यांनी राज्यात घेण्यात येणाऱ्या निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन पद्धतीबाबत न्यूझीलंड देशाच्या शिष्टमंडळाला सविस्तरपणे समजावून सांगितले. महाराष्ट्र राज्यातून देशाच्या ९४% द्राक्ष निर्यात करण्यात येते. सन २०२३-२४ मध्ये ३ लाख २४ हजार ६४१ मेट्रीक टन निर्यात झाली आहे. यामध्ये युरोपीय युनियन मधील नेदरलँड्स, पोलंड, रोमानिया, जर्मनी, देशासह, युनायटेड किंग्डम, चीनसह बऱ्याच प्रगतशील देशांचा समावेश आहे परंतु न्यूझीलंड देशाला जैवसुरक्षा बाबत कारणास्तव निर्यात बंद आहे. 

सदर देशात द्राक्ष निर्यात सुरू करण्यासाठी फलोत्पादन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, निर्यात विषयक कार्यपद्धती व प्रोत्साहनामुळे गुणवत्ता पूर्ण उत्पादन होऊन निर्यात सुरू करण्याच्या अडचणीवर मात केली असल्याने न्यूझीलंड देशाकडून निर्यात सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी असे आवाहन संचालक फलोत्पादन डॉ. कैलास मोते यांनी केले.

यासोबतच डॉ. ग्यान संबंधन यांनी कृषी माल निर्यात करताना अदा करावयाच्या फायटो सॅनिटरी प्रमाणपत्र बाबत माहिती दिली. न्यूझीलंड देशाला द्राक्ष निर्यात करताना सर्व खबरदारी घेण्यात येईल असे शिष्टमंडळास आश्वस्त केले व चालू वर्षी नियमित निर्यात सुरु झाली नाही तर किमान चाचणी खेपेस (Trail Shipment) परवानगी मिळावी अशी विनंती केली.

त्यावेळी शिष्टमंडळ प्रमुख केरेन पौग यांनी कृषी निर्यात सुरु करणेची प्रक्रिया वेळखाऊ आहे परंतु नाशिक जिल्ह्यातील प्रत्यक्ष भेटीनंतर लवकरच चाचणी खेपेस (Trail Shipment) परवानगी बाबत निर्णय घेऊ असे मत केले.

अपेडाच्या जनरल मॅनेजर विनिता सुधंशु यांनी, अपेडा सर्व सहभागधारक यांना एकत्रित घेवून कृषीमाल निर्यातीस प्रोत्साहन देत असते असे मत व्यक्त केले. ग्रेपनेट हि प्रणाली अपेडाने २००३-०४ पासून युरोपीय युनियन द्राक्ष निर्यात करण्यासाठी विकसित केली असून त्यामुळे मागील दुवा (backward linkage) साधने सोपे जाते. पॅकिंगवर नमूद केलेल्या बारकोडमुळे एखाद्या खेपेत अडचण निर्माण झाल्यास त्याचा मागील दुवा शोधून आवश्यक कार्यवाही केली जाते. सदर प्रणाली मुळे गुणवत्ता पूर्ण माल निर्यात करणे शक्य झाले असून लवकरच द्राक्ष निर्यातीचे सोपस्कार पार पडले तर न्यूझीलंडवासियांना भारतीय द्राक्षाची चव चाखायला मिळेल अशा आशावाद व्यक्त केला.

या बैठकीमध्ये विनिता सुधंशु जनरल मॅनेजर अपेडा नवी दिल्ली, राज्याचे फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते, डॉ. ग्यान संबंधन (सहसंचालक, पिक संरक्षण), प्रशांत वाघमारे (डेप्युटी जनरल मॅनेजर अपेडा), निर्यातदार व अन्य सहभागधारक उपस्थित होते. यासोबतच या बैठकीला न्यूझीलंडहून आलेल्या शिष्टमंडळामध्ये केरेन पौग, लिली ब्रेलफोर्ड व आदर्शाना मिस्त्री यांचा समावेश होता. 

टॅग्स :द्राक्षेशेतकरीशेती क्षेत्र