Join us

New MD of KRIBHCO : एम. आर. शर्मा यांची कृषक भारती कोऑपरेटिव्ह लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 09:32 IST

कृभकोमध्ये १९८२ मध्ये पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाल्यानंतर, व्यवस्थापकीय संचालक पदावर पोहोचणारे ते पहिले पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी आहेत.

कृषक भारती कोऑपरेटिव्ह लिमिटेड (कृभको) चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून एम. आर. शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शर्मा यांच्याकडे व्यवस्थापकीय संचालक या व्यतिरिक्त संचालक (तांत्रिक) याचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्यांनी १ सप्टेंबर २०२४ पासून कृभकोचा पदभार स्विकारला आहे.

दरम्यान, एम. आर. शर्मा, (IIT रुरकी १९८१ चे रसायनिक अभियांत्रिकी पदवीधर) यांना उर्वरक उद्योगात प्रामुख्याने अमोनिया आणि युरिया उत्पादनाच्या एकात्मिक संयंत्रांसह संबंधित उपयुक्तता संयंत्रांमध्ये ४२ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. कृभकोमध्ये १९८२ मध्ये पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाल्यानंतर, व्यवस्थापकीय संचालक पदावर पोहोचणारे ते पहिले पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी आहेत.

कृभको मधील त्यांच्या विविध भूमिकांदरम्यान, त्यांनी अनेक प्रकल्पांचे नेतृत्व केले आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी अमोनिया आणि युरिया कॉम्प्लेक्सच्या सुधारणेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. कोविड-१९ च्या काळात, कच्चा माल आणि कामगारांच्या अनुपलब्धतेमुळे पश्चिम भारतातील बहुतेक खत संयंत्रे बंद करावी लागली, तेव्हा शर्मा यांनी विक्रमी ऊर्जा कार्यक्षमतेसह उत्पादन सुविधा १०० टक्क्यांहून अधिक क्षमतेने चालू ठेवण्यात यश मिळवले.

त्यांच्या प्रशंसनीय योगदानाबद्दल, त्यांना सदर्न गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री तर्फे उत्कृष्ट सीईओ म्हणून सन्मानित करण्यात आले. पुढे २०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या प्रतिष्ठित 'द सीईओ मॅगझिन' मध्ये त्यांची निवड करण्यात आली. या व्यतिरिक्त इतर अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.(ही माहिती डॉ.व्ही.के.तिवारी संयुक्त महाव्यवस्थापक (विपणन) यांच्या द्वारे प्रसारित करण्यात आली आहे.)

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीखते