Join us

राज्यातील निव्वळ लागवडीखालील क्षेत्र येणार रेकॉर्डवर; कायम पड क्षेत्राची ई-पीक पाहणीत होणार नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 13:23 IST

सातबारा उताऱ्यावर असलेले कायम पड अर्थात पेरणी अयोग्य असलेले क्षेत्र आता ई-पीक पाहणीच्या माध्यमातून रेकॉर्डवर येणार आहे. परिणामी सध्या एकूण लागवड क्षेत्रात असलेले हे क्षेत्र कमी केल्यास राज्यातील निव्वळ लागवडीखालील क्षेत्र स्पष्ट होणार आहे.

सातबारा उताऱ्यावर असलेले कायम पड अर्थात पेरणी अयोग्य असलेले क्षेत्र आता ई-पीक पाहणीच्या माध्यमातून रेकॉर्डवर येणार आहे. परिणामी सध्या एकूण लागवड क्षेत्रात असलेले हे क्षेत्र कमी केल्यास राज्यातील निव्वळ लागवडीखालील क्षेत्र स्पष्ट होणार आहे. भूमी अभिलेख विभागाने याबाबत जानेवारीतच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हे क्षेत्र नोंदविण्याचे निर्देश दिले होते.

मात्र, त्याबाबत उदासीनता दिसून आली. त्यामुळे पुन्हा हे क्षेत्र ई-पीक पाहणीतून नोंदविण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांच्या स्तरावर नोंदणीसाठी ३० सप्टेंबरची मुदत असून, त्यानंतर सहायकांच्या स्तरावर ही नोंदणी होईल, याची दक्षता घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यात २०१३च्या कृषी गणनेनुसार राज्यात सरासरी १ कोटी ६९ लाख हेक्टरवर लागवड केली जात असल्याचे गृहीत धरले जाते. मात्र, ही आकडेवारी निश्चित नाही. यात कायम पड असलेल्या क्षेत्राचाही समावेश आहे. या कायम पड क्षेत्राची नोंद काही शेतकऱ्यांनी सातबारा उताऱ्यावर केली आहे. मात्र, काहींनी ती केलेली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष लागवडीखालील क्षेत्राची आकडेवारी कमी आहे.

राज्यात सुमारे ४ कोटी स्वमालकीचे क्षेत्र आहे. तर सुमारे ३ कोटी शेते आहेत. यात काही क्षेत्र वैयक्तिक तर काही क्षेत्र सामाईक आहे. राज्यामध्ये ११ कोटी लोकसंख्येपैकी महसूल विभागातील अधिकार अभिलेखात सातबारा उतारा नावावर असलेल्यांची संख्या १ कोटी ७१ लाख आहे. मात्र, यातील सर्वच जण शेती करतात असे नाही.

शहरांलगतच्या अनेक गावांमध्ये तुकड्यांमध्ये शेती नावावर आहे. प्रत्यक्षात हे क्षेत्र बिगर शेती नसल्याने ते अजूनही शेती म्हणूनच अधिकार अभिलेखात नोंदले गेले आहे. त्यामुळेच कायम पड किंवा अकृषक क्षेत्र रेकॉर्डवर आणण्याची मोहिम सुरू झाली आहे.

पीक पाहणीची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असेल

ई पीक पाहणी सध्या डिजिटल क्रॉप सर्व्हे या अॅपद्वारे करण्यात येत आहे. सद्यःस्थितीमध्ये राज्यातील लागवडी योग्य क्षेत्र १ कोटी ६९ लाख हेक्टरपैकी ८१ लाख ४ हजार हेक्टर अर्थात ४७.८९ टक्के क्षेत्रातील पिकांची नोंद झाली आहे. पूर्वी दिलेल्या १४ सप्टेंबरच्या मुदतीत शेतकरी स्तरावरील पिकांची नोंद किमान ६० टक्के होणे अपेक्षित होते. त्या तुलनेत पीक पाहणीचे प्रमाण कमी आहे.

शेतकरी स्तरावरील पीक पाहणी झाल्यावर सहाय्यक स्तरावर पीक पाहणी करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यामध्ये एकूण ४९ हजार ३६६ सहायकांची नोंद झाली. सहायकांमार्फत प्रत्येक गावातील १०० टक्के स्वमालकीच्या क्षेत्रातील पीक पाहणी करून घेण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असेल.

लागवड क्षेत्राची आकडेवारी अचूक मिळण्यासाठी मदत

• शहरीकरण आणि नागरीकरणामुळे जमिनींचे तुकडे होऊन ५ गुंठ्यांखालील क्षेत्राचा वापर रहिवाशासाठी केला जात आहे. त्याची नोंद अद्यापही शेतीक्षेत्रातच केली जात आहे.

• प्रत्यक्षात इतक्या कमी क्षेत्रावर कुठेही लागवड केली जात नाही. त्यामुळे असे क्षेत्र नावावर असणारे जमिन मालक ई-पीक पाहणी करत नाहीत. भूमी अभिलेख विभागाने याची जिल्हानिहाय यादी जिल्हा प्रशासनास पाठविली.

• या यादीची प्रत्यक्ष पडताळणी करून लागवडीखालील स्वमालकीच्या क्षेत्रातून हे क्षेत्र वगळण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे मूळ लागवडीखालील क्षेत्रातून पडक्षेत्राची वजावट होणार आहे.

कायम पड क्षेत्राची नोंद झाल्यास त्याचे एकत्रित रेकॉर्ड राज्य सरकारकडे उपलब्ध होईल. त्यातून निव्वळ लागवडीखालील क्षेत्राची खरी आकडेवारी समोर येईल. त्यातून राज्य सरकारला नियोजन करणे शक्य होईल. - सरिता नरके, राज्य संचालक, माहिती तंत्रज्ञान कक्ष, भूमी अभिलेख विभाग, पुणे.

हेही वाचा : प्राण्यांच्या संपर्कातून पसरणारा जीवघेणा आजार; जाणून घ्या ब्रुसेलोसिसची लक्षणं, कारणं आणि उपचार

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीपीकसरकारमहसूल विभाग