Join us
Daily Top 2Weekly Top 5

नुसत्या दवाच्या ओलाव्यावर होतेय गव्हाची नैसर्गिक शेती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 15:41 IST

रायरेश्वर किल्ल्यावर कोणत्याही प्रकारच्या खताचा वापर न करता शेणखताचा वापर करून हिवाळ्यातील थंडीतील दवाच्या ओलाव्यावर नैसर्गिक गहू पिकवला जातो. मात्र यावेळी उत्पादनात घट होईल असे शेतकरी सांगत आहेत.

सूर्यकांत किंद्रेभोर : रायरेश्वर किल्ल्यावर कोणत्याही प्रकारच्या खताचा वापर न करता शेणखताचा वापर करून हिवाळ्यातील थंडीतील दवाच्या ओलाव्यावर नैसर्गिक गहू पिकवला जातो. मात्र यावेळी उत्पादनात घट होईल असे शेतकरी सांगत आहेत.

भोर तालुक्यातील रायरेश्वर हे सह्याद्री पर्वत रांगांच्या घाटमाथ्यावरील विस्तीर्ण पठार आहे. भोरपासून २७ किलोमीटर अंतरावर असलेल्या या मुऱ्हा रायरेश्वराच्या पठारावर ऐतिहासिक शिवमंदिर आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सहकारी मावळ्यांसोबत एप्रिल १६४५ ला 'हिंदवी स्वराज्य' स्थापनेची शपथ घेतली होती. या पवित्र 'हिंदवी स्वराज्य शपथभूमी' येथे ४० जंगम कुटुंब वास्तव्यास आहेत. येथील जंगम कुटुंब आपली उपजीविका भागवण्यासाठी पठारावर शेती करत आहेत तर काही जण पुणे, मुंबईसारख्या शहरात कामधंदा करीत आहेत.

रायरेश्वरावरील ग्रामस्थ गहू या प्रमुख पिकांबरोबर भात या पिकांचे उत्पादन घेत असतात. पावसावरील भात पीक काढून झाल्यावर येथील ग्रामस्थ पारंपरिक पद्धतीने चालत आलेली नैसर्गिक गव्हाची शेती मोठ्या प्रमाणात करत आहेत. भात पीक काढून झाल्यावर त्या ठिकाणी बैल व मनुष्याद्वारे मशागत करून गव्हाच्या पिकासाठी शेती तयार केली जाते. या दिवसांत रायरेश्वर पठारावर करत असलेल्या गहू शेतीमुळे सगळीकडे हिरवेगार दिसून येते.

अधिक वाचा: आता ज्वारीपासून तयार करता येणार गुळ; कशी करायची लागवड

प्रामुख्याने गहू या पिकाच्या उत्पादनावर येथील ग्रामस्थांचे वर्षाचे गणित अवलंबून असते. या गव्हाच्या शेतीला कोणत्याही प्रकारचे पाणी दिले जात नाही. कोणत्याही रासायनिक खतांचा, औषधांचा वापर केला जात नाही. पेरणीसाठीचे बियाणेसुद्धा बाजारातून न आणता पारंपारिक पद्धतीने पिकत असलेल्या शेतीतून हे बियाणे हे ग्रामस्थ आजतागायत वापर करत आहेत. तसेच ही गहू शेती पूर्णपणे पडत असलेल्या दव व थंडीच्या गारव्यावर अवलंबून असते.

श्री रायरेश्वर, शंभू महादेवाच्या आशीर्वादाने आजतागायत गव्हाचे पीक विना पाण्यावर चांगल्या प्रकारे पिकत असते. पारंपरिक पद्धतीने व ग्रामस्थांच्या एकमेकांच्या सहकार्याने शेती करत असतो. बैलांचा वापर करून शेतीची मशागत करत असतो. मात्र सध्या ट्रॅक्टर किल्ल्यावर आणल्याने यंत्राच्या साहाय्याने शेती केली जाते. या सेंद्रिय गव्हाला चांगली मागणी असून ४० ते ४५ रु. प्रतिकिलोस दर मिळतो. मागणीनुसार आम्ही शिडींपर्यंत गहू विक्रीसाठी आणून देतो. मात्र यावर्षी गव्हाच्या उत्पादनात घट होईल. - नारायण जंगम, ग्रामस्थ

टॅग्स :गहूपीकशेतीशेतकरीभोरगड