Pune : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे नवे कुलगुरू डॉ. विलास खर्चे सद्या पुणे कृषी महाविद्यालयाच्या दौऱ्यावर आहेत. मृदा दिनानिमित्ताने कृषी महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली होती. तर आज महाविद्यालयाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास त्यांनी भेट दिली. संशोधन केंद्राने उभे केलेले काम हे समय सूचक असून या कामाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, देशी गाय संशोधन केंद्राने जोपासलेल्या सहिवाल, गीर, राठी, थारपारकर आणि लाल सिंधी या देशी दुधाळ गोवंशांची व खिलार, लाल कंधारी, देवणी, गवळाऊ, कोकण कपिला, डांगी आणि पुंगनूर या देशी गोवंशांची पाहणी केली. संशोधन केंद्रातील सर्व गोठे, दूध उत्पादन व प्रक्रिया युनिट, बायोगॅस सयंत्र, सौर ऊर्जा युनिट, शेण व गोमूत्र प्रक्रिया युनिट, पशुधनाकरता आवश्यक असणाऱ्या आयुर्वेदिक औषधींची धन्वंतरी बाग, गो परीक्रमा, वातावरण नियंत्रित गोठा तसेच संशोधन केंद्राने विकसित केलेले एकात्मिक गोपालन मॉडेल या सर्व बाबींची त्यांनी पाहणी केली.
केंद्राद्वारे राबविल्या जात असलेल्या विविध संशोधन कार्यक्रमांची व प्रशिक्षण व विस्तार कार्यक्रमांची त्यांनी माहिती घेतली. याप्रसंगी त्यांनी देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या कामाचे कौतुक केले व नैसर्गिक शेतीमध्ये देशी गाईंची महत्त्वपूर्ण भूमिका लक्षात घेता हे उभे केलेले काम अत्यंत समय सूचक असल्याचे सांगितले. संशोधन केंद्र कृषिविद्या, कृषी सूक्ष्मजीवशास्त्र, कृषी कीटकशास्त्र, वनस्पती विकृतीशास्त्र, मृदा शास्त्र, कृषि अभियांत्रिकी, कृषि अर्थशास्त्र, कृषि विस्तार, अशा कृषीतील सर्व विद्या शाखांना सोबत घेऊन आंतरविद्याशाखीय सहभागातून संशोधन करीत असल्याने त्यास वेगळेच महत्त्व प्राप्त होते असे ते म्हणाले.
या संशोधन केंद्राने केलेले कामाची दखल केवळ देशभरातच नव्हे तर जगभरात घेतली जाणे गरजेचे आहे व हे सर्व काम, त्याचे वैज्ञानिक निष्कर्ष यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार असे त्यांनी सांगितले. नैसर्गिक शेतीचा पाया देशी गाय आहे, त्यामुळे देशी गाईंचे, त्यांच्या विविध जातींचे संवर्धन व संगोपन होणे ही काळाची गरज आहे असे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी त्यांनी नैसर्गिक शेती आधारित प्रशिक्षण कार्यक्रम तात्काळ सुरू करणे बाबत सूचना केल्या आहेत.
Web Summary : Dr. Vilas Kharche visited Pune Agricultural College, emphasizing native cows' role in natural farming. He praised the research center's work with various native breeds and stressed the need for international recognition and immediate natural farming training programs.
Web Summary : डॉ. विलास खर्चे ने पुणे कृषि महाविद्यालय का दौरा किया, जिसमें प्राकृतिक खेती में देसी गायों की भूमिका पर जोर दिया गया। उन्होंने विभिन्न देशी नस्लों के साथ अनुसंधान केंद्र के काम की सराहना की और अंतर्राष्ट्रीय मान्यता और तत्काल प्राकृतिक खेती प्रशिक्षण कार्यक्रमों की आवश्यकता पर बल दिया।