Pune : राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून (NSC) शेतकऱ्यांना दर्जेदार आणि खात्रीशीर बियाणांचा पुरवठा करण्यात येतो. नुकताच या महामंडळाने कौतुकास्पद कामगिरी केली असून केंद्रीय कृषी मंत्रालयाला ३५ कोटींचा लाभांश दिला आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाला महामंडळाकडून देण्यात आलेला हा आत्तापर्यंतचा सर्वाधिक लाभांश असून हा ऐतिहासिक टप्पा आहे.
दरम्यान, मागच्या काही वर्षांमध्ये या महामंडळाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला. ज्यामध्ये शेतकऱ्यांना प्रत्येक हंगामातील नगदी पिके, भाजीपाला पिके, अन्नधान्य, तृणधान्य, तेलबिया या पिकांचे बियाणे उपलब्ध करून देण्यात येतात.
त्यासोबतच सीएमडी डॉ. मनिंदर कौर द्विवेदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय बियाणे महामंडळ लिमिटेड (एनएससी) ने कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाला ३५.३० कोटी रुपयांचा आतापर्यंतचा सर्वाधिक लाभांश देऊन एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.
"शेतकऱ्यांना नेहमीच चांगल्या दर्जाचे बियाणे पुरवले गेले पाहिजे आणि या मोहिमेत राष्ट्रीय बियाणे महामंडळाने आघाडीची भूमिका बजावावी." असे मत केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव श्री देवेश चतुर्वेदी, सहसचिव (बियाणे) श्री अजित कुमार साहू आणि एनएससी आणि कृषी मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
NSC काय आहे?एनएससी ही १९६३ मध्ये स्थापन झालेली एक अनुसूची 'ब'-मिनी रत्न श्रेणी-१ कंपनी आहे, जी पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची आणि कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे. भारतात कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रमाणित बियाण्यांचे उत्पादन आणि वितरण करण्याचे काम ही कंपनी करते.