संदेश हजारेजवळा : पेरणीचा हंगाम सुरू झाल्याने ग्रामीण भागात शेतकऱ्यांची आर्थिक गरज मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
बी-बियाणे, खते, फवारणी औषधे इत्यादी शेतमालाच्या खरेदीसाठी पैसे उपलब्ध करणेसाठी सोने-चांदीचे दागिने गहाण ठेवणे किंवा त्याची मोड करण्याच्या प्रमाणात दहा टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे स्थानिक सराफ व्यवसायिकांनी सांगितले.
यंदा सोने-चांदीचे दर तुलनेत अधिक असल्याने मोडलेल्या दागिन्यांमधून शेतकऱ्यांना अधिक परतावा मिळत आहे. मात्र काही शेतकरी थेट दागिने मोडण्याऐवजी सुवर्ण तारण योजना स्वीकारत आहेत.
बँका तसेच खासगी फायनान्स कंपन्यांकडून मिळणाऱ्या कमी व्याजदराच्या सुवर्ण तारण कर्जामुळे शेतकरी त्या पर्यायाकडे वळत असल्याचे दिसून येत आहे.
शेतीसाठी गरजेच्या खरेदीला प्राधान्य देताना शेतकरी आता पारंपरिक आर्थिक साठ्यांवर अवलंबून राहू लागले आहेत. यामुळे पेरणीच्या काळात ग्रामीण अर्थचक्रात सोनं-चांदी हे पुन्हा एकदा महत्त्वाचं आर्थिक साधन बनलं आहे.
पेरणी सुरू झाली की बी-बियाणे, खते, औषधं यासाठी मोठा खर्च येतो. आमच्याकडे सध्या थेट पैसे नव्हते, म्हणून घरातलं थोडं सोनं मोडलं. यंदा भाव चांगले आहेत, त्यामुळे थोडं सोनं मोडूनही पुरेसा पैसा मिळाला. - नागेश जाधव, शेतकरी, जवळा
मी या वर्षी दागिने मोडले नाहीत, तर बँकेत तारण ठेवले. तेथून कर्ज मिळालं आणि बी-बियाणं घेतलं. दागिन्यांचं मूळ रूपसुद्धा राहिलं आणि गरजाही भागल्या. पुढच्या हंगामात परतफेड करून दागिने परत घेईन. - हनुमंत मोहळकर, शेतकरी, नान्नज
पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना पैसा आवश्यक असतो. त्या वेळी शेतकरी स्वतः जवळील सोने-चांदी मोडतात. त्यानंतर पीक आले की ते पुन्हा सोने-चांदी खरेदी करत असतात. तसेच अनेक शेतकरी दागिने मोडण्याऐवजी ते तारण ठेवून कर्ज घेणे पसंत करत आहेत. - ओमप्रकाश कथले, सुवर्ण व्यावसायिक जवळा
पेरणीच्या काळात ग्रामीण भागात सोने मोडण्याचे प्रमाण नेहमी वाढते, पण यंदा भाव जास्त असल्याने ग्राहक फार विचार करून येतात. काही जण थोडंसं सोनं मोडूनही मोठी रक्कम उभी करतात. त्यामुळे आमच्याकडे मागणीसह व्यवहाराचं प्रमाणही वाढलं आहे. - शिवानंद कथले, सुवर्ण व्यावसायिक, जवळा
सोने-चांदीचे भाव काय? (सोने प्रति तोळा, चांदी प्रति किलो)
वर्ष | सोने | चांदी |
२०२१ | ५१,००० | ४३,००० |
२०२२ | ५५,००० | ४८,००० |
२०२३ | ६८,००० | ६७,००० |
२०२४ | ७१,००० | ८०,००० |
२०२५ | ९६,००० | १,०५,००० |
अधिक वाचा: पीएम किसानचा २० वा हप्ता लवकरच खात्यावर जमा होणार; यादीत तुमचे नाव कसे चेक कराल?