Join us

Minority Development Department : राज्यात बचत गटांसाठी 'इतक्या' कोटींचा निधी; कोणाला मिळणार लाभ वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 15:22 IST

राज्यातील अल्पसंख्याक बहुल क्षेत्रामध्ये महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या स्वयंसहायता बचत गट योजनेच्या २०२४-२५ आर्थिक वर्षासाठी ७ कोटींचा निधी वितरित करण्यास अल्पसंख्याक विकास विभागाने मान्यता दिली आहे. (Minority Development Department)

Minority Development Department : राज्यातील अल्पसंख्याक बहुल क्षेत्रामध्ये महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या स्वयंसहायता बचत गट (self-help groups) योजनेच्या २०२४-२५ आर्थिक वर्षासाठी ७ कोटींचा निधी वितरित करण्यास अल्पसंख्याक विकास विभागाने मान्यता दिली आहे.

त्यानुसार राज्यातील विविध भागांत बचत गट स्थापन करण्यात येणार असून या योजनेअंतर्गत अल्पसंख्याक महिलांच्या २ हजार ४०० बचत गट निर्माण करून त्यांचे १३ लोक संचालित साधन केंद्रे ८ वर्षांच्या कालावधीत उभी राहणार आहेत.

राज्यातील अल्पसंख्याक बहुल क्षेत्रात (Minority Development) वास्तव्यास असलेल्या लोकसमूहातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांना संघटित करून पुरेसा पतपुरवठा उपलब्ध करून देणे व त्यांना उद्योजकतेविषयक आवश्यक असलेली माहिती देऊन त्यांच्यामध्ये उद्योजकीय कौशल्ये विकसित करण्यासाठी अल्पसंख्याक लोकसमूहातील महिलांचे स्वयंसहायता बचत गट स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

महिला आर्थिक विकास महामंडळाने ३१ मार्च २०२० पर्यंतच्या मागील ८ वर्षात ३ हजार २०० बचत गट व ८ लोकसंचालित साधन केंद्राची स्थापना केली आहे. योजनेचा कालावधी संपुष्टात आल्याने योजनेस १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२५ या पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

योजनेअंतर्गत २०२३-२४ या आर्थिक वर्षात वितरित करण्यात आलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करून महिला आर्थिक विकास महामंडळाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात ३ कोटी ८३ हजार इतका निधी वितरित करण्याची विनंती केली होती. त्यास मंजुरीही मिळाली आहे.

२०२४-२५ या आर्थिक वर्षात स्वयंसहायता बचत गटासाठी सहायक अनुदान म्हणून ७ कोटी निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत योजनेच्या अर्थसंकल्पित निधीच्या ६० टक्के मर्यादेपर्यंत निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यात 'या' शहरांचा समावेश

या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात मुंबई शहर, मुंबई उपनगर, नांदेड, मालेगाव, कारंजा, परभणी, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, भिवंडी, मुंब्रा-कौसा आणि मिरज येथे अल्पसंख्याक लोकसमूहातील महिलांचे स्वयंसहायता बचत गट स्थापन करण्यात येणार आहेत.

टॅग्स :शेती क्षेत्रमहिलामहिला आणि बालविकाससरकारी योजनासरकारमहाराष्ट्र