Join us
Daily Top 2Weekly Top 5

Millets : मिलेट्सचे आरोग्याला फायदे काय? का खावेत तृणधान्यांपासून बनलेले पदार्थ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 17:19 IST

Milletsतृणधान्ये अतिशय पौष्टिक असतात. २०१८ पासून त्यांना पोषक धान्य किंवा पोषक तृणधान्ये म्हटले जाऊ लागले. ही पोषणविषयक सुरक्षा पुरवितात तसेच गहू व तांदूळाने प्राप्त केलेल्या अन्न सुरक्षिततेपेक्षा तृणधान्याने एक मोठे पाऊल पुढे टाकले आहे.

तृणधान्ये किंवा मिलेट्स (Millets) हे आपल्या आहारातील सर्वांत महत्त्वाचे घटक आहेत. २०२३ हे वर्ष आपण आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष किंवा मिलेट्स ईअर म्हणून साजरे केले. पण मिलेट्स किंवा तृणधान्ये खाण्याचे फायदे काय आहेत हे आपल्याला माहितीये का?

* तृणधान्ये अतिशय पौष्टिक असतात. २०१८ पासून त्यांना पोषक धान्य किंवा पोषक तृणधान्ये म्हटले जाऊ लागले. ही पोषणविषयक सुरक्षा पुरवितात तसेच गहू व तांदूळाने प्राप्त केलेल्या अन्न सुरक्षिततेपेक्षा तृणधान्याने एक मोठे पाऊल पुढे टाकले आहे.

* तृणधान्ये ही तंतुमय पदार्थांनी समृध्द असलेली धान्य असून ती मानवी आतड्यामधील सूक्ष्म जीवसमूहासाठी चांगले जीवाणू (प्रोबायोटिक) म्हणून कार्य करतात, तृणधान्यांतील तंतुमय पदार्थ स्थूलांत्रे सजल ठेवतात आणि चयापचय क्रिया अतिशय चांगल्या स्थितीत ठेवतात. अशा प्रकारे तृणधान्य ही पचनविषयक आरोग्य चांगले ठेवण्यात योगदान देतात व आतड्यातील हालचाली नियमीत ठेवण्यास मदत करतात.

* तृणधान्य ही ग्लुटेनमुक्त असून ज्यांना रक्तातील साखरेचा व पोटातील विकारांचा त्रास आहे आणि जे ग्लुटेन सोडून देऊ इच्छितात अशा व्यक्तीसाठी तृणधान्य ही गव्हाऐवजी योग्य पर्याय ठरु शकतात.

* तृणधान्यांमध्ये कर्बोदके कमी असतात आणि त्यामुळे पचायला जास्त वेळ लागतो. म्हणून ग्लुकोजचे विघटन संथगतीने होते. रक्तप्रवाहात ग्लुकोज येण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि त्यामुळे रक्ताची पातळी स्थिर राहते. हे मधुमेहाच्या नियंत्रणासाठी फायदेशीर आहे, कारण मिलेटच्या सेवनामुळे रक्तातील ग्लुकोज नियंत्रणात राहते.

* तंतुमय पदार्थाव्यतिरिक्त तृणधान्ये ही खनिजे, बी कॉम्प्लेक्स, जीवनसत्वे, लोह, कॅल्शियम व जस्त यांसारख्या सूक्ष्म पोषक घटकांनी समृध्द आहेत.

* तृणधान्ये ही आरोग्याला चालना देणाऱ्या फायटोकेमिकल्स, फिनोलिक संयुगे, टॅनिन यांसारख्या घटकांनी समृध्द असून त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत.

* तृणधान्य आम्ल (अॅसिड) न बनवणारी, पचायला सोपी आहेत व अॅलर्जीजन्य नाहीत.

* तृणधान्य, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे आजार, टाईप २ चा मधुमेह, कर्करोग, पोटातील आतड्यासंबधीचे विकार व स्थूलता यांना प्रतिबंध करण्यात महत्वाची भूमिका बजावतात.

* जागतिक आरोग्य संघटनेच्या २०२१ च्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, तृणधान्यांमुळे टाईप २ च्या मधुमेहाचा धोका कमी होण्यास व मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये एचबीए १ सी चे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते. कारण तृणधान्यांचा ग्लायसेमिक निर्देशांक कमी असतो. अन्नामुळे रक्तातील साखरेची पातळी किती लवकर वाढली जाते याचे मोजमाप करण्यासाठी ग्लायसेमिक निर्देशांकाचा वापर केला जातो.

* तृणधान्यांचा कमी ग्लायसेमिक निर्देशांक हा प्रामुख्याने त्यांच्यातील उच्च तंतुमय पदार्थामुळे असतो. जेव्हा ती पोटात मिसळली जातात तेव्हा ती हळूहळू शोषली जातात व मैदाजन्य अन्नापेक्षा लवकर तृप्त झाल्याची भावना निर्माण करतात. तृणधान्ये ही जेवणानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करतात.

* तृणधान्यांमुळे कोलेस्टेरॉलचे शोषण कमी होऊ शकते आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

* तृणधान्ये चवीला सुगंधी लागत नाहीत तथापि, तृणधान्यापासून आता अतिमऊ ब्रेड, लापशी, गरमागरम खिचडी, इडली, डोसे व अन्य स्वादिष्ट मिष्टान्न देखील बनवली जात आहेत.

(माहिती स्त्रोत - महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीअन्न