Join us

Millet Excellence Center; बारामती मिलेट सेंटरचा जीआर रद्द, आता सोलापुरातच होणार उभारणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 10:51 AM

राज्य सरकारने सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर केलेले श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला हलविण्याचा निर्णय अखेर रद्द झाला आहे. या केंद्रासाठी लवकरात लवकर जागा शोधा, निधीची तरतूद करा, असे निर्देश देण्यात आले.

राज्य सरकारने सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर केलेले श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला हलविण्याचा निर्णय अखेर रद्द झाला आहे. या केंद्रासाठी लवकरात लवकर जागा शोधा, निधीची तरतूद करा, असे निर्देश आमदार सुभाष देशमुख यांनी गुरुवारी जिल्हा प्रशासनाला दिले.

राज्य सरकारने ९ मार्च २०२३ रोजी महाराष्ट्र श्री अन्न अभियान राबविण्याची घोषणा केली. त्यानुसार सोलापुरात श्री अन्न उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यास मान्यता दिली होती. परंतु, हे केंद्र बारामतीला हलविण्याचा निर्णय २४ नोव्हेंबर २०२४ रोजी अचानक घेण्यात आला. जिल्ह्यातील शेतकरी, आमदार, राजकीय कार्यकर्त्यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.

आपल्या तीव्र नाराजीच्या भावना 'लोकमत'च्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचविल्या होत्या. आमदार सुभाष देशमुख यांनीही हा निर्णय रद्द न झाल्यास राजीनामा देईन, अशी घोषणाच केली होती. अखेर चार महिन्यांनी सरकारने हा निर्णय रद्द केल्याचा आदेश काढला आहे.

आमदार सुभाष देशमुख यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि आत्माच्या संचालकांशी संवाद साधला. सरकारने प्रकल्प पुन्हा सोलापुरात ठेवला. या केंद्राची जागा, मनुष्यबळ यासाठीचा प्रस्ताव तातडीने द्या, जागेची अडचण येणारच नाही, मला काय करावे लागेल ते सांगा, असेही देशमुखांनी सांगितले.

हे केवळ 'लोकमत'मुळे घडलेआमदार सुभाष देशमुख म्हणाले, सोलापूरचे केंद्र बारामतीला हलविण्यात आल्याची माहिती मला सर्वप्रथम 'लोकमत'च्या माध्यमातून मिळाली. मी तातडीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. त्यांनाही या निर्णयाची पूर्ण कल्पना नव्हती.

मात्र, त्यांनी लगेच माहिती घेऊन हा निर्णय रद्द करण्याचा शब्द दिला होता. हा शब्द पूर्ण झाला. पण, केवळ 'लोकमत'ने जिल्ह्याच्या हिताची माहिती तातडीने दिल्यामुळेच घडले, असेही देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :सोलापूरशेतकरीशेतीराज्य सरकारबारामतीसुभाष देशमुख