Join us

कुणी काम देतंय का काम? रोजगारासाठी कुटुंबांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 14:13 IST

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील देऊर गावातून सुमारे दोनशेपेक्षा अधिक मजुर कुटुबांनी स्थलांतर केले आहे.

नंदुरबार : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतशिवाराची परिस्थिती बिकट झाली आहे. तसेच नंदुरबार  जिल्ह्यात एकही उद्योग नसल्याने रोजगाराची वानवा प्रकर्षाने जाणवत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात मजुरांचे स्थलांतर होत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील देऊर या एका गावातून सुमारे दोनशेपेक्षा अधिक मजुर कुटुबांनी हंगामी कामासाठी गुजरात, सौराष्ट्र तसेच कर्नाटक सीमेलगतच्या परिसरात स्थलांतर केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यात रोजगाराची ओरड सुरू आहे. ग्रामीण भागात रोजगार नसल्याने मिळेल ते काम करून अनेक मजूर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. तर, काहीजण छोट्या-मोठ्या उद्योगधंद्यांवर आपल्या परिवाराचे भरण-पोषण करीत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात उद्योग व्यवसायासाठी लोकप्रतिनिधीसह प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

तरुणाईची पाऊले शहराकडे वळली

सध्या पदभरतीच्या जाहिराती निघत नाहीत. पर्यायी कंत्राटी भरतीदेखील नाही. तसेच लहान-मोठ्या व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध होत नसल्याने कामाच्या शोधात अनेक युवकांची पाऊलं शहराकडे वळत आहेत. अल्पशिक्षित तरुण-तरुणी मोलमजुरी करीत आहेत, तर बारावी ते पदवीपर्यंत झालेले युवक लहान-मोठ्या कंपन्यांमध्ये तर काही खाजगी दुकानात मिळेल ते काम करीत आहेत. यामध्ये उच्चशिक्षित तरुणांचाही भरणा वाढत चालला आहे.

मजुरीसाठी मराठवाड्याचा रस्ता 

शहादा तालुक्यात मजुरांना स्थायी स्वरूपात काम मिळेल, असा कुठलाही उद्योगधंदा नाही. गावात शेतीकामाशिवाय इतर कोणतेही कामे नाहीत. रोजगार हमी योजनेच्या कामावर मजूर काम करतात. परंतु काही मजूर रोजगारासाठी हंगामी स्वरूपात स्थलांतर करतात, असं देऊर गावच्या सरपंच रेखाबाई गिरासे यांनी सांगितले. तर शहादा तालुक्यातील वडाळी, बामखेडा, जयनगर, धांद्रे, देऊर- कमखेडा, खैरवे-भडगाव यासह अनेक गावांतील हजारो मजूर रोजगाराच्या शोधात गुजरातमधील सौराष्ट्र, जुनागड आदी शहरांकडे धाव घेत आहेत. काहीजण ऊसतोडीसाठी मराठवाड्याचा रस्ता धरत असल्याचे मजुरांकडून सांगण्यात आले आहे.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

 

टॅग्स :नंदुरबारशेतीकर्मचारी