Join us

MGNREGA Scheme : राज्यात मग्रारोहयोच्या कामात 'हे' जिल्हे अग्रेसर; ६६९ ग्रापंमध्ये ४९९६ कामे सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 16:11 IST

MGNREGA Scheme : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमध्ये (मग्रारोहयो) मनुष्यदिन निर्मितीत टार्गेटच्या तुलनेत १२९.५२ टक्के काम झाल्याने अमरावती जिल्हा राज्यात तिसरा आहे. अजून कोणते जिल्हे टॉपवर आहेत ते वाचा सविस्तर

गजानन मोहोड

अमरावती : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमध्ये (मग्रारोहयो) मनुष्यदिन निर्मितीत टार्गेटच्या तुलनेत १२९.५२ टक्के काम झाल्याने जिल्हा राज्यात तिसरा आहे. गरजू लोकांच्या हाताला या योजनेमुळे काम मिळाले आहे.

जिल्ह्यात सद्यस्थितीत ६६९ ग्रा.पं. मध्ये ४९९६ कामे सुरू आहेत व या कामांवर ८३ हजार ७०९ हातांना रोजगार मिळाला आहे. ग्रामीण कुटुंबातील प्रत्येक प्रौढ लाभार्थ्याला ग्रामसभेत सहभागी होण्याचा आणि त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये मग्रारोहयो अंतर्गत कामे निवडीचा व प्राधान्यक्रम ठरविण्याचा अधिकार आहे.

यामध्ये गावातील मजुराला त्यांच्या घरापासून ५ किमी अंतरात काम देणे आवश्यक आहे. जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत ६४ लाख ६१ हजार ५०७ मनुष्यदिनाचे टार्गेट असतांना १ जानेवारीपर्यंत ८३ लाख ६९ हजार १७७ मनुष्यदिनाचे काम झालेले आहे. ही टक्केवारी १२९.५२ इतकी आहे. यामध्ये राज्यात अहमदनगर टॉपवर तर अकोला जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मग्रारोहयो अंतर्गत जिल्हाभरात विविध कामे करण्यात येत आहेत. काही वर्षांपूर्वी फक्त जलसंधारणाची कामे करण्यात येत होती. आता मात्र वैयक्तिक लाभाचीही कामे करण्यात येत आहेत. याशिवाय विविध विभागांमार्फतही कामे होत असल्याने जिल्ह्यातील ८४ हजार हातांना काम मिळाले आहे.

उपजिल्हाधिकारी ज्ञानेश घ्यार यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील १४ तालुक्यांत व खास करून मेळघाट या आदिवासीबहुल भागात व्यापक प्रमाणात कामे होत असल्याने मजुरांच्या हातांना कामे मिळाली आहेत. वर्षभरात १०० दिवसांचा रोजगार हा केंद्र शासनाद्वारा देण्यात येतो तर त्यावरील दिवसांची मजुरी राज्य शासनाद्वारा देण्यात येत आहे. योजनेमध्ये पुरुष व महिलांना समान २९७ रुपये प्रतिदिन मजुरी मिळते आहे.

काय आहे मनुष्यदिन निर्मिती?

योजनेच्या कामावर एक दिवस एका माणसाने काम केले की एक मनुष्यदिन तयार होतो. आठवड्यात सहा दिवस कामे सुरू असते व सहा दिवसाचे एक मस्टर असते. याप्रकारे जिल्ह्यात १ जानेवारी २०२५ पर्यंत १ लाख ११ हजार ६१३ कुटुंबातील २ लाख १३ हजार ०८३ व्यक्तींना कामे मिळाली आहेत. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत ८३ लाख ६९ हजार १७७ मनुष्यदिनाची निर्मिती झाली आहे.

८४ हजार मजुरांच्या हाताला काम

सद्यस्थितीत ८३ हजार ७०६ मजुरांना गाव परिसरात काम मिळाले आहे. यामध्ये सर्वाधिक ३८ हजार ७१० मजूर चिखलदरा तालुक्यातील आहे. धारणी २६ हजार ५९५, अचलपूर ३ हजार १७७, अमरावती १ हजार ४०९, अंजनगाव सुर्जी ८७०, भातकुली ५७८, चांदूर रेल्वे ७०६, चांदूरबाजार १ हजार ७८७, दर्यापूर ७२९, धामणगाव ३७४, मोर्शी ३ हजार ९१३, नांदगाव १ हजार ४६८, तिवसा १ हजार ७४५ व वरुड तालुक्यात १ हजार ६४८ मजूर आहेत.

हे ही वाचा सविस्तर: MGNREGA Scheme : मनरेगाच्या कामांना कार्यारंभ आदेश मिळूनही लागणार ब्रेक काय आहे कारण वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रसरकारसरकारी योजनाकेंद्र सरकारशेतकरी