Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील महिला शास्त्रज्ञाने लावला मिथेन खाणाऱ्या जिवाणूचा शोध

By दत्ता लवांडे | Updated: September 5, 2024 20:29 IST

त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील मुळशी, जुन्नर येथे होणाऱ्या भात शेतीतून हा जिवाणू शोधून काढला आहे. मिथायलोक्युक्युमिस असं या काकडीच्या आकारासारख्या दिसणाऱ्या जिवाणूचं नाव आहे. 

पुणे : मिथेन हा ग्लोबल वार्मिंगसाठी जबाबदार असलेला सर्वांत घातक हरितगृह वायू असून पुण्यातील संशोधन संस्थेतील महिला शास्त्रज्ञांनी मिथेन खाणाऱ्या जिवाणूचा महत्त्वपूर्ण शोध लावला आहे. या जिवाणूंमुळे भातशेतीमध्ये होणाऱ्या मिथेनचे उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार असल्याचा निष्कर्ष त्यांनी संशोधनातून मांडला आहे. 

दरम्यान, डॉ. मोनाली रहाळकर असं या महिला शास्त्रज्ञांचे नाव असून त्यांनी हे महत्त्वाचं संशोधन केलं आहे. जर्मनीमध्ये पीएचडीचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेत सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ म्हणून काम करण्यास सुरूवात केली. जगात खूप कमी शास्त्रज्ञ मिथेन खाणाऱ्या जिवाणूवर संशोधन करतात, त्यातील मोनाली या एक आहेत. त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील मुळशी, जुन्नर येथे होणाऱ्या भात शेतीतून हा जिवाणू शोधून काढला आहे. मिथायलोक्युक्युमिस असं या काकडीच्या आकारासारख्या दिसणाऱ्या जिवाणूचं नाव आहे. 

हा जिवाणू जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील भातशेतीमध्ये त्यांना आढळला असून पुढे मावळ, कोकण, दिवेआगार, नागाव, अलिबाग येथील पाणथळ जागेत आणि भातशेतीतही हा जिवाणू सापडला आहे.  या जिवाणूंच्या ८० ते १०० प्रजाती शोधण्याचे आणि संवर्धन करण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केलं आहे.  

या जिवाणूमुळे काय होतो फायदा?मिथेन (Methane gas) खाणारे जिवाणू हे प्रामुख्याने पाणथळ जागेत आणि भातशेतीमध्ये आढळतात. भात शेतीमधून पर्यावरणासाठी घातक असलेला मिथेन हा वायू उत्सर्जित होतो. या वायूमुळे ग्लोबल वार्मिंगला (Global Warming) आमंत्रण मिळते. त्याचबरोबर मिथेन वायूमुळे कार्बन डायऑक्साईडपेक्षाही २६ पट जास्त वातावरणातील तापमान वाढते. मिथायलोक्युक्युमिस जिवाणू मिथेन खाऊनच जगत असल्यामुळे या जिवाणूंची पैदास वाढल्यास पर्यावरणाला फायदा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

मिथेन वायू जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत आहे. मिथेन खाणारे जिवाणू अत्यंत उपयुक्त असून पर्यावरणासाठी महत्त्वाचे आहेत. मी माझ्या प्रयोगशाळेत मिथेन खाणाऱ्या जवळपास ७० ते ८० प्रजाती संवर्धित केल्या आहेत. या जिवाणूंचा भात शेती आणि अन्य ठिकाणी कसा उपयोग करता येईल यावर संशोधन सुरू आहे.- डॉ. मोनाली रहाळकर (सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ, आघारकर संशोधन संस्था, पुणे) 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीसंशोधनभात