Join us

Mavim : उद्योगांच्या माध्यमातून 'माविम'च्या बचत गटांकडून वर्षाकाठी कोट्यवधींची उलाढाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 15:15 IST

Mavim : महिला आर्थिक विकास महामंडळाकडून (माविम) (MAVIM) गेल्या १२ वर्षात ४,४०० बचत गट स्थापन करण्यात आले. त्यापैकी सद्यः स्थितीत चार हजारांपेक्षा अधिक बचत गट सक्रिय असून, अधिकांश महिलांनी उद्योगांची कास धरली आहे.

वाशिम जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाकडून (माविम) (MAVIM) गेल्या १२ वर्षात ४,४०० बचत गट स्थापन करण्यात आले. त्यापैकी सद्यःस्थितीत चार हजारांपेक्षा अधिक बचत गट सक्रिय असून, अधिकांश महिलांनी उद्योगांची कास धरली आहे.

त्यातून वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे, अशी माहिती 'माविम'चे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागापुरे यांनी दिली. (MAVIM )

२४ फेब्रुवारी १९७५ रोजी महाराष्ट्र शासनाकडून महिला आर्थिक विकास महामंडळाची (माविम) स्थापना करण्यात आली; तर २० जानेवारी २००३ रोजी शासनाने 'माविम'ला (MAVIM) बचत गटांच्या माध्यमातून महिला सबलीकरणाच्या योजना राबविण्यासाठी नोडल संस्था म्हणून जाहीर केले.

दरम्यान, महिलांमधील क्षमता ओळखून त्याचे संवर्धन करणे, त्यांच्यातील आत्मविश्वास वृद्धिंगत करणे, उद्योजकीय विकास साधणे, रोजगार संधी आणि बाजारपेठेत समन्वय निर्माण करणे, आदी उद्देश समोर ठेवून 'माविम'ची (MAVIM) जिल्ह्यातही यशस्वी वाटचाल सुरू आहे.

४४०० बचत गट कार्यरत

गेल्या १२ वर्षात 'माविम'ने जिल्ह्यात ४,४०० बचत गट स्थापन करून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले आहे.

महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करता यावा, यासाठी बचत गटांना कोट्यवधी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले असून, महिलांनीही नियमित परतफेड करण्यासोबत स्वतः चा विकास साधल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.

महिलांनी महिलांना दिली रोजगाराची संधी

महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यामुळे सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने सकारात्मक वाटचाल होत आहे. अनेक महिलांनी स्वतः चा व्यवसाय सुरू करून इतर महिलांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

विविध उद्योगांमध्ये उत्तुंग भरारी

महिला बचत गटांनी कृषी प्रक्रिया उद्योग, दुग्ध व्यवसाय, खाद्यपदार्थ निर्मिती, शिवणकाम, हँडमेड उत्पादने आणि किरकोळ विक्री व्यवसाय यांसारख्या विविध उद्योगांत यश मिळवले आहे.

महिला बचत गटांचे जाळे अधिक व्यापक होत असून, जिल्ह्यात महिलांच्या हातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. महिला उद्योजकता वाढीस लागली आहे. - राजेश नागापुरे, जिल्हा समन्वय अधिकारी, माविम

हे ही वाचा सविस्तर : Silk and Milk Revolution : सिल्क आणि मिल्क क्रांती शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणार! - नीलेश हेलोंडे

टॅग्स :शेती क्षेत्रमहिलामहिला आणि बालविकाससरकारी योजनाशेतकरीशेती