Join us

झेंडूच्या फुलांनी शेतकऱ्याच्या जीवनात दरवळला 'सुगंध'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 10:34 AM

चैत्र महिना सुरु झाल्याने अनेक सण-उत्सव आणि यात्रा-जत्रांचा हंगाम सुरू झाल्याने विविध फुलांची मागणी वाढली आहे. मागील एक महिना फुलांना भाव मिळत नसल्यामुळे उत्पादक शेतकरी चिंतित होते.

दुष्यंत बनकरचैत्र महिना सुरु झाल्याने अनेक सण-उत्सव आणि यात्रा-जत्रांचा हंगाम सुरू झाल्याने विविध फुलांची मागणी वाढली आहे. मागील एक महिना फुलांना भाव मिळत नसल्यामुळे उत्पादक शेतकरी चिंतित होते.

मात्र, सण, उत्सव व यात्रा- जत्रांची चाहूल लागल्यामुळे झेंडू (गोंडा) व इतर फुलांना मागणी वाढल्याने दरात चांगली वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत चांगल्या प्रकारे बाजारभाव मिळत असल्यामुळे अणे माळशेज परिसरातील फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

डिंगोरे, उदापूर, बनकर फाटा, बल्लालवाडी आलमे, नेतवड, माळवाडी, मढ, पिंपळगाव जोगा, सांगणोरे, खिरेश्वर, सितेवाडी, तळेरान, ओतूर, रोहकडी, आंवेगव्हाण उंब्रज, इत्यादी भागातील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात झेंडू व शेवंतीसह विविध फुलांची ठिबक, मल्चिंग आदीचा वापर करून आधुनिक पद्धतीने लागवड करतात.

रोपांच्या लागवडीनंतर तीन ते चार महिन्यांत शेवंतीच्या फुलांचा तोडणी हंगाम सुरू होतो, तर झेंडूच्या फुलांचे दोन महिन्यांत उत्पन्न चालू होते. बाजारभाव चांगले मिळत असल्याने उत्पादकांना चांगले दिवस आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मागील १५ दिवसांपासून फुलांची भाववाढ झाली आहे.

व्यापाऱ्यांनी प्रतवारी व रंगानुसार झेंडूच्या फुलांची प्रतिकिलोग्रॅम ३० ते ६० रुपये बाजारभावाने खरेदी केली जात आहे. बाजारभावात सुमारे दुप्पट वाढ झाली आहे. अणे माळशेज परिसरात जवळपास ७०० ते ८०० हेक्टरवर फुलशेती केली जाते.

कितीही आर्थिक संकटे आली तरी येथील शेतकरी पिढ्यानपिढ्या फुलशेती शेती करत आहेत. सणासुदीच्या कालावधीत फुलांना वाढीव भाव मिळत असल्याने बागायती भागातील शेतकरी फुलशेतीकडे आकर्षित झाले आहेत.

या परिसरातील झेंडू, गुलाब, अॅस्टर, गुलछडी, लीली आदी फुले विकत घेण्यासाठी सणासुदीला फूल व्यापारी शेतावरच माल खरेदीसाठी येता असतात, गतवर्षीच्या तुलनेत चांगला बाजारभाव मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

नियोजन केल्यास अडचण येणारच नाही - डिंगोरे येथील माजी सरपंच संदीप बबन मंडलिक यांनी आपल्या एक एकर शेतीपैकी तीस गुंठ्यात कलकत्ता जातीच्या झेंडूची (गोंडा) ५२०० रोपे साधारणतः १:५० रुपये प्रमाणे विकत घेऊन दोन महिन्यांपूर्वी लागवड केली.त्यासाठी त्यांनी मल्चिंग कागद, ठिबक व खते प्रथम तोडणीपर्यंत असे चाळीस हजार रुपये खर्च करून उत्तम बाग फुलविली आहे. शेतीमध्ये योग्य पिकांचे उत्पादन व नियोजन करून केल्यास अडचणी येणारच नाही, असे शेतकरी संदीप बबन मंडलिक माजी सरपंच, डिंगोरे यांनी सांगितले.

अधिक वाचा: ह्या फुलाला असतो वर्षभर बाजारभाव; कशी कराल लागवड?

टॅग्स :शेतकरीशेतीफुलशेतीफुलंपीकबाजारमार्केट यार्ड