Join us

अल्प खर्च, कमी मशागत, कमी वेळात अधिक उत्पादन व उत्पन्न देणाऱ्या बांबूची गुढी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 11:30 AM

टिकाऊ, लागवडीचा अल्प खर्च, कमी मशागत, कमी वेळात अधिक उत्पादन व उत्पन्न देणाऱ्या बांबूच्या लागवडीकडे अनेकजण वळत आहेत. बांधकाम व्यवसाय, मांडव उभारणी, विविध वस्तुनिर्मिती व शोभेसाठी आणि गुढीपाडव्यासाठी बांबूला मागणी वाढली आहे.

टिकाऊ, लागवडीचा अल्प खर्च, कमी मशागत, कमी वेळात अधिक उत्पादन व उत्पन्न देणाऱ्या बांबूच्या लागवडीकडे अनेकजण वळत आहेत. बांधकाम व्यवसाय, मांडव उभारणी, विविध वस्तुनिर्मिती व शोभेसाठी आणि गुढीपाडव्यासाठी बांबूला मागणी वाढली आहे. याशिवाय पनवेलमुंबईसारखी मोठी बाजारपेठ जवळ असल्याने ठिकठिकाणी शास्त्रशुद्धरित्या बांबू लागवड होत आहे.

पालीतील रवींद्र लिमये यांनी आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड केली आहे. गुढीपाडव्यानिमित्त बांबू विक्रीदेखील सुरू आहे. सुधागड तालुक्यातील उद्धर येथील प्रयोगशील शेतकरी तुषार केळकर हे बांबूपासून इको फ्रेंडली घरे तयार करतात आणि याचे प्रशिक्षण देखील देतात.

त्याचबरोबर सुधागड तालुक्यातील शहा यांनी आपल्या शेतामध्ये बांबूची लागवड केली आहे. सुधागड तालुक्यातील ढोकशेत येथे सचिन सूर्यकांत टेके व प्रतीक्षा सचिन टेके यांनी साडेचार एकर क्षेत्रामध्ये 'बांबूविश्व' उभारले आहे. बांबू लागवड करून शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केलेला आहे.

त्यांच्या 'बांबूविश्व' या बांबू बनात एकूण १३०० हून अधिक बांबूची लागवड केलेली आहे. त्यात मुख्यत्वे माणगा ही प्रजाती व इतर ३४ अनेकविध प्रजातींचे बांबू आहेत. जिल्ह्यातील इतरही शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे यासाठी ते निःशुल्क बांबू लागवड परिसंवाद आयोजित करतात.

या परिसंवादात बांबू लागवड, उत्पन्न, खर्च, मार्केट, जमीन, हवा पाणी, बांबूच्या विविध प्रजाती, रोपांची उपलब्धता, फायदा व तोटा यासंदर्भात परिपूर्ण मार्गदर्शन केले जाते. याबरोबरच स्व अनुभवातून त्यांनी बांबू लागवडीसंदर्भात परिपूर्ण माहिती देणारी एक पुस्तिकादेखील तयार केली आहे, ती निशुल्क पीडीएफद्वारे अनेकांना पुरवितात. याशिवाय त्यांच्याकडे माणगा जातीचे ४००० रोपे, टुल्डा जातीची ३५०० विविध प्रजातींची बांबूची रोपे उपलब्ध आहेत.

पनवेल व मंबई मार्केटमध्ये चांगल्या काठीला ७० ते ८० रुपये दर मिळतो. लागवडीनंतर चार वर्षानी बांबू तोड करावी. दुसऱ्या वर्षापासून केवळ तण काढण्यासाठी मजुरी आणि खते यासाठी खर्च येतो. ऑक्टोबर ते मे महिन्यापर्यंत बांबूना पाणी द्यावे. - सचिन टेके, बांबू शेतकरी

टॅग्स :शेतीशेतकरीकोकणबांबू गार्डनपीकपनवेलमुंबई