Join us

Satbara : जिवंत सातबारा मोहीम! चावडी वाचन करून मृतांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 16:07 IST

सातबारावरील मालक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांची नावे त्वरित कमी करून वारसांची नोंद घेणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

सोलापूर : राज्य शासनाने जिवंत सातबारा मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. या मोहिमेत सातबारा उताऱ्यावर असलेल्या मृत खातेदारांची नावे कमी करून त्यांच्या वारसांची नोंद करण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपला सातबारा जिवंत आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन महसूल विभागाकडून करण्यात आले आहे. सातबारावरील मालक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांची नावे त्वरित कमी करून वारसांची नोंद घेणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

ज्या शेतजमिनींचे मालक निधन पावले आहेत, त्यांच्या वारसांची नोंद आता सातबारावर लावली जाणार आहे. यापूर्वी बहुतांश प्रकरणांत वारसांकडून नोंद लावण्यासाठी उशीर होत असल्याने सातबारा कागदोपत्री जिवंत राहत नसे. आता जिल्हा प्रशासन ग्रामपंचायत परिसरात चावडी वाचन करून मृत शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करणार आहे. त्यानंतर वारसांनी आवश्यक कागदपत्रे सादर केल्यावर त्यांची नावे सातबारावर समाविष्ट केली जाणार आहेत.

जिवंत सातबारा म्हणजे मृत व्यक्तींची नावे सातबारा उताऱ्यावरून वगळून त्यांच्या वारसांची नोंद करणे. या प्रक्रियेमुळे जमीन खरेदी-विक्री, कर्जसुविधा, शासकीय अनुदान यासाठी वारसांना येणाऱ्या अडचणी दूर होतील.

पुन्हा मिळाली मुदतवाढ१ ते ५ एप्रिलदरम्यान मृत शेतकऱ्यांच्या नावांची यादी चावडी वाचनाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी ग्राम महसूल अधिकारी व तलाठ्यांनी पुढाकार घेतला. ६ ते २० एप्रिलदरम्यान वारसांची नावे लावण्याची प्रक्रिया सुरू झाली. संबंधित वारसदारांनी आवश्यक कागदपत्रे तलाठ्यांकडे जमा केली. २१ एप्रिल ते १० मे दरम्यान फेरफार तयार करून मंडल अधिकाऱ्यांनी निर्णय घेऊन सातबारा दुरुस्ती केली. मृतांना वगळता कुटुंबातील वारसांची नोंद सातबारावर करण्याचे काम अद्याप सुरू आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी