Join us

Agriculture News : छत्तीसगडला जाणारा युरिया पकडला, शेतकऱ्यांनी जागीच विकत घेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 20:10 IST

Agriculture News : युरिया वाटून घेत गावकऱ्यांनी त्याचे २७० रुपये प्रतिगोणीप्रमाणे कृषी अधिकाऱ्यांना जागेवरच पैसेही दिले.

गडचिरोली : चोरीछुपे छत्तीसगडला नेला जाणारा आरमोरी तालुक्यातील एका व्यापाऱ्याची युरियाची (Urea) मालवाहू जीप कोहका ग्रामस्थांनी पकडली. तालुक्यात युरियाची टंचाई असल्याने पकडलेला युरिया वाटून घेत गावकऱ्यांनी त्याचे २७० रुपये प्रतिगोणीप्रमाणे कृषी अधिकाऱ्यांना जागेवरच पैसेही दिले.

वैरागड (ता. आरमोरी) येथून मालवाहू जीपमधून एका कृषी केंद्रातील युरिया छत्तीसगडला नेला जात होता. कोरची तालुक्यात युरिया खताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. कृषी केंद्रात जे युरिया खत आहे, तो व्यापारी चढ्या दराने विकतात, अशी ओरड आहे.

अशातच चोरीचे खत घेऊन छत्तीसगडला निघालेली जीप गावकऱ्यांनी पकडली. त्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून माहिती दिली. कृषी अधिकारी येईपर्यंत जीपचालकास गावकऱ्यांनी पकडून ठेवले होते, त्यास कोरची पोलिसांच्या स्वाधीन केले. तो कृषी केंद्रचालकाचा मुलगा आहे.

कृषी अधिकारी सुनील जमकातन, अमोल डोंगरवार आणि गुण नियंत्रक ईश्वर पाथोडे यांनी तातडीने कोहका येथे धाव घेतली. कृषी अधिकाऱ्यांसमोर ७५ गोणी युरिया वाटून घेतला. त्याचे २७० रुपये गोणीप्रमाणे पैसे एकत्रित करून ते कृषी अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, ऐन हंगामात खतासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागत असल्याचे चित्र आहे. 

कांदा रोपवाटिकेवरील रोग, किडींचा जीवनक्रम तोडण्यासाठी काय कराल, वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रखतेकृषी योजनाखरीप