चंद्रपूर : लाखनी तालुक्यातील पोहरा (मानेगाव) येथील शेतकरी मुकेश मते आणि त्यांच्या पत्नी शारदा मते यांनी झेंडू लागवडीत आधुनिक मल्चिंग पेपर तंत्र वापरून त्यांच्या दीड एकर क्षेत्रात यशस्वी प्रयोग केला आहे. या आधुनिक तंत्राच्या वापरामुळे उत्पादन वाढीसोबतच पाणीबचत, खर्चात बचत व दर्जेदार उत्पादन मिळवता आले आहे.
पारंपरिक पद्धतीपेक्षा आधुनिकतेकडे वळत मते दाम्पत्याने मल्चिंग पेपरचा अवलंब केला. त्यांच्या प्रयोगाचे मुख्य उद्देश पिकाचे उत्पादन वाढवणे, पाण्याचा अपव्यय टाळणे, मजुरीचा खर्च कमी करणे, प्रथम बेड तयार करणे व ठिबक सिंचन लावणे. त्यावर मल्चिंग पेपर पसरवणे, रोपे लावण्यासाठी ठराविक अंतरावर छिद्रे करणे, नंतर निवडक झेंडू रोपांची लागवड छिद्रांमधून करण्यात आली.
प्रेरणास्थान ठरलेला प्रयोगमते दाम्पत्याचा हा प्रयोग पाहून परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी मल्चिंगपेपरचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. झेंडूसाठी २५ ते ३० मायक्रॉन जाडीचे मल्चिंग पेपर योग्य. उन्हाळ्यात पांढरा-काळा किंवा चांदी-काळा पेपर अधिक फायदेशीर, कारण तो उष्णता व परावर्तनसुद्धा नियंत्रित करतो. मल्चिंग लावताना पेपर व्यवस्थित टाचून बसवावा, तसेच छिद्र करताना ठिबक पाइपचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी.
मल्चिंग तंत्राचे मुख्य फायदे
- तणनियंत्रण : पेपरमुळे तण वाढत नाही, त्यामुळे तण काढण्याचा खर्च वाचतो.
- पाणी बचत: मातीतील ओलावा टिकतो, बाष्पीभवन कमी होते, पाण्याची बचत होते.
- उत्पादन वाढ : झेंडू फुलांचा दर्जा व रंग सुधारतो; बाजारपेठेत चांगला दर मिळतो.
- कमी मजुरी खर्च : तण कमी आल्यामुळे मजुरीचा खर्चही कमी.
- सुरक्षितता : फुलांमध्ये कीड- रोगाचा प्रादुर्भाव कमी, पीक संरक्षण मिळते.
- तापमान नियंत्रण: जमिनीचे तापमान नियंत्रणात राहते, त्यामुळे पीक वाढ झपाट्याने होते.
- जलद उगवण : मल्चिंगच्या आच्छादनामुळे सूक्ष्म वातावरण तयार होते, उगवण जलद होते.
झेंडू हे पीक कमी कालावधीत साधारणतः २ ते ३ महिन्यांत चांगले उत्पन्न देते. दसरा, दिवाळी, गणेशोत्सव आणि इत सण-समारंभांमध्ये झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. मल्चिंग तंत्राचा वापर केल्याने झेंडूचे उत्पादन वाढून फुलांचा दर्जा सुधारतो, ज्यामुळे बाजारात चांगला भाव मिळतो आणि शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य मिळते.- मुकेश मते, प्रयोगशील शेतकरी.