Join us
Daily Top 2Weekly Top 5

खतांचे चुकीचे मिक्सिंग पिकांना घातक, सुसंगत जोड्या कोणत्या, जार टेस्ट का आवश्यक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 14:50 IST

Agriculture News : शेतीसाठी रासायनिक खत किंवा कीटकनाशकांची भेसळ (मिक्सिंग) केल्यास पिकांना घातक ठरणारे आहे.

अमरावती : शेतीसाठी रासायनिक खत किंवा कीटकनाशकांची भेसळ (मिक्सिंग) केल्यास पिकांना घातक ठरणारे आहे. यामुळे परिणाम शून्य व विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

शेतीमध्ये कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके व विद्राव्य खतांचा वाढता वापर होत असताना, औषधांची भेसळ हा अत्यंत संवेदनशील विषय ठरला आहे. अनेक शेतकरी वेळ, मजुरी व खर्च वाचवण्यासाठी एकाच फवारणीत दोन-तीन औषधे मिसळतात. मात्र, तांत्रिक माहितीशिवाय केलेले हे मिश्रण पिकांसाठी घातक ठरू शकते.

सर्व रसायने एकमेकांशी सुसंगत नसतात. काही औषधे एकत्र केल्यास रासायनिक प्रतिक्रिया होऊन मिश्रण गरम होते, दही पडते किंवा साका तयार होतो. याचा थेट परिणाम पिकांच्या आरोग्यावर होतो.

फवारणीसाठी आधी पाणी, नंतर विद्राव्य खते, त्यानंतर भुकटी औषधे, मग प्रताही औषधे आणि शेवटी द्रव औषधे घालावित. बोर्दो मिश्रण नेहमी स्वतंत्र फवारावे. त्यासोबत कोणतेही कीटकनाशक मिसळणे धोकादायक ठरू शकते, असे कृषी विभागाने सांगितले.

औषधांची भेसळ हा संवेदनशील विषयकीटकनाशक किंवा रासायनिक खतांची तांत्रिक माहितीशिवाय मिक्सिंग करणे धोकादायक आहे. हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. याबाबत कृषी विभागाने जागृती करणे महत्त्वाचे आहे.

'जार टेस्ट' का आवश्यक ?दोन औषधे एकत्र चालतील की नाही, याची शंका असल्यास जार टेस्ट करावी. छोट्या बाटलीत पाणी घेऊन औषधे मिसळून पाहावीत. मिश्रण गरम झाले, दही पडले, साका साचला किंवा रंग अचानक बदलला, तर ते मिश्रण फवारणीसाठी वापरू नये, लेबलवरील सूचना व कृषी तज्ज्ञांचा सल्ला न घेता औषधांची भेसळ करू नका, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

सुसंगत जोड्या कोणत्या? माहिती करणे आवश्यकबहुतेक कीटकनाशके व बुरशीनाशके एकत्र वापरता येतात. १९:१९:१९ सारखी विद्राव्य खते कीटकनाशकांसोबत दिल्यास पिकांची वाढ व संरक्षण एकाच वेळी मिळते. बुरशीनाशकांसोबत अमिनो अॅसिड किंवा ह्युमिक अॅसिड टॉनिक दिल्यास पिकांना रोगातून सावरण्यास मदत होते. तसेच, निम तेल रासायनिक कीटकनाशकांसोबत वापरल्यास किडीवरील नियंत्रण अधिक प्रभावी ठरते, असे तज्ज्ञ सांगतात.

सल्फरसोबत तेल दिल्यास पाने करपतातगंधक व कोणतेही तेलयुक्त औषध किंवा निम तेल एकत्र वापरू नये. सल्फरसोबत तेल दिल्यास पाने करपतात.ब्ल्यू कॉपर, कोसाईड ही विद्राव्य खते (एनपीके) किंवा अँटीबायोटिक्ससोबत मिसळू नयेत. कॅल्शियम नायट्रेट व सल्फेटयुक्त खते किंवा फॉस्फरसयुक्त खते एकत्र केल्यास साका तयार होतो आणि ठिबक सिंचन चोकअप होण्याचा धोका वाढतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Wrong fertilizer mixing harmful; know compatible pairs, why jar test?

Web Summary : Mixing incompatible fertilizers/pesticides harms crops, warns agriculture dept. Jar tests are crucial to check compatibility. Certain combinations boost growth; avoid mixing sulfur with oil. Always consult experts before mixing.
टॅग्स :खतेशेती क्षेत्रशेतीपीक व्यवस्थापन