Join us

Womens Day : पतीचा आधार गेला, उमेद न हरता तिने कसली शेती, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 12:55 IST

Womens Day : पतीच्या निधनानंतर शेतीची धुरा सांभाळत आजघडीला यशस्वीरीत्या शेती कसत आहेत..

- विजय मानकरगोंदिया : अभ्यासात हुशार असलेली मुलगी आपले करिअर घडवण्यासाठी उच्च शिक्षण घेण्याच्या वाटेवर असताना आई-वडिलांनी तिचे लग्न लावून दिले. लग्नानंतरही शिक्षण घेण्यासाठी धडपड सुरू असताना काळाने झडप घातली. सहा महिन्यांचे चिमुकले बाळ असताना पतीचा खून झाल्याने संसार उद्ध्वस्त झाला. कुटुंबाचा आधारवड हरपला. त्यात चिमुकल्याची जबाबदारी आली. अखेर बाळाला सांभाळण्यासाठी तिने सर्व इच्छांचा त्याग करीत उच्च शिक्षण घेऊनदेखील ती शेती (Women Farmer) करून उदरनिर्वाह करीत आहे.

सालेकसा तालुक्यातील पाथरी येथील लिल्हारे कुटुंबातील सुनिताने चांगले शिक्षण घेऊन मोठ्या पदाची नोकरी करण्याचे स्वप्न बाळगले. ती नियमित शाळेत जायची. शिवाय अभ्यासातसुद्धा ती खूप हुशार होती. बारावी बोर्डाच्या परीक्षेत ती प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. पदवी महाविद्यालयात प्रवेश घेतला. पण याच दरम्यान कुटुंबीयांनी सुनिताचे लग्न नवेगाव येथील गणेश दमाहे या युवकासोबत लावून दिले. लग्नानंतर सुनिताने पुढे शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. पतीने होकार दिला. 

बीए प्रथम वर्षात शिक्षण सुरू होते. याच दरम्यान सुनिता बाळाची आई झाली. बाळ सहा महिन्यांचे झाले याच दरम्यान तिच्या कुटुंबांवर काळाने झडप घातली. क्षुल्लक कारणावरून तिच्या पतीचा खून झाला. सुनिताचा संसारच उद्ध्वस्त झाला. कुटुंबावर आभाळ कोसळले. कुटुंबात कुणीही नाही एक मात्र सासरे होते. त्यांना याचा धक्का बसला अन् काही दिवसांनी त्यांचेही निधन झाले. घरी सुनिता एकटीच आणि तिचे सहा महिन्यांचे चिमुकले बाळ. काय करावे, कसे जगावे, कुठे राहावे हे तिला काहीच कळेना. वडील तिला धीर देत होते. 

सुनिताला वाटले स्नातक शिक्षण पूर्ण करून कुठे तरी नाेकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. पण लहान बाळाला सोडून तिला बाहेर जाणे शक्य नव्हते. तिने घरीच अभ्यास करीत आपले स्नातकपर्यंत शिक्षण पूर्ण केले. पदवीधर झाल्यानंतर काॅम्प्युटरमध्ये एमएससीआयटी प्रशिक्षण पूर्ण केले. पदवीचे शिक्षण पूर्ण करून काॅम्प्युटर प्रशिक्षण घेतले. पण चिमुकल्याला सोडून जाऊन नोकरी करणे शक्यच नव्हते. त्यामुळे कुटुंबाची तीन एकर शेती करून त्यावरच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा निर्णय घेतला. चिमुकल्या बाळासाठी सुनिताला आपल्या सर्व इच्छांचा त्याग करावा लागला.

अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडसुनिताचा मुलगा आता चौदा वर्षांचा झाला आहे. सुनिता दिवसभर आपल्या शेतात राबून आपल्या मुलाला चांगले शिक्षण देऊन तिचे अधुरे राहिलेले स्वप्न ती मुलाच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी धडपडत आहे. तिच्या या संघर्षाला महिला दिनी शतदा सलाम !

टॅग्स :शेती क्षेत्रजागतिक महिला दिनजागर "ती"चा