जळगाव : पावसानंतर शेतात तरारलेल्या पिकांवर वन्यप्राण्यांच्या कळपांचे हल्ले वाढले आहेत. हे प्राणी केवळ पिकांची नासधूस करत नाहीत, तर प्रसंगी ते शेतकऱ्यांवरही हल्ला हल करतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई दिलासा देणारी ठरत आहे.
अलीकडे वन्यप्राण्यांमुळे शेतीचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढत चाललं आहे. शिवाय काही ठिकाणी पशुधनावर हल्लाही झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पशुधनाचा मृत्यूही झाला आहे. अशावेळी संबंधित कुटुंबासाठी नुकसानभरपाई दिली जाते. यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो.
पिकांच्या नुकसानीसाठी किती मदत ?वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. त्यात कोरडवाहू पिकांसाठी प्रतिहेक्टरी १८ हजार रुपये, बागायती पिकांसाठी प्रतिहेक्टरी २५ हजार, तर फळबागांसाठी प्रतिहेक्टरी ५० हजार रुपयांची मदत दोन हेक्टर क्षेत्रासाठी दिली जाते.
कुठे आणि कशी मागायची दाद?वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा. नुकसानीची माहिती मिळाल्यावर वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी शेताची पाहणी करतात. शेतकरी, वनकर्मचारी आणि तलाठी यांच्या उपस्थितीत पंचनामा केला जातो. पंचनामा पूर्ण झाल्यावर, शेतकऱ्याच्या बँक खात्यात थेट नुकसानभरपाई जमा केली जाते.
हल्ल्यात मृत्यू झाल्यास २५ लाखांची मदतवन्यप्राण्याच्या हल्ल्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, सरकारकडून त्याच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची मदत दिली जाते. व्यक्ती गंभीर जखमी झाल्यास ५ लाख आणि किरकोळ जखमी झाल्यास ५० हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाते.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांबरोबर काम करत आहोत. शेतकऱ्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती द्यावी म्हणजे आम्ही पंचनामा करू आणि त्यांना लवकरात लवकर भरपाई मिळवून देऊ.- राम धोत्रे, उपवनसंरक्षक, जळगाव वनविभाग.
शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी. जर जंगली प्राण्यांकडून नुकसान झाले असेल तर त्यांनी वेळ न घालवता वनविभागाशी संपर्क साधावा.- कुरबान तडवी, जिल्हा कृषी अधीक्षक