Join us

Wild Animal Attack : वन्यप्राण्यांचा हल्ला; शेतकऱ्यांना मिळणार १ कोटींचा आधार वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 10:39 IST

Wild Animal Attack : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे वाढलेल्या नुकसानीला वन विभागाने दिलासा दिला आहे. बाधित शेतकरी, पशुपालक आणि जखमी/मृत व्यक्तींच्या वारसांना तब्बल १ कोटी रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा करण्यात आली. या निर्णयामुळे पिकांचे नुकसान, पशुधनाची हानी आणि जीवितहानी झालेल्यांना मोठा आधार मिळाला आहे. (Wild Animal Attack)

शिरीष शिंदे 

बीड जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे वाढणारे नुकसान थोपवण्यासाठी वन विभागाने नुकसानग्रस्तांना दिलासा देणारी महत्त्वाची पावले उचलली आहेत. (Wild Animal Attack)

२०२४-२५ आणि चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ५६१ बाधित शेतकरी, पशुधनमालक आणि जखमी/मृत व्यक्तींच्या वारसांना एकूण १ कोटी ३ लाख रुपयांची आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली.(Wild Animal Attack)

वन्यप्राण्यांमुळे वाढले नुकसान

गेल्या काही महिन्यांत बीड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांतून शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पशुधनाचा मृत्यू, तसेच माणसांवरही हल्ल्याचे प्रकार घडले आहेत. या परिस्थितीचा गंभीर विचार करून वन विभागाकडून पीडितांना वेळेवर नुकसानभरपाई देण्यात येत आहे.

नुकसानभरपाईचे तपशील

पीक नुकसान

सन २०२४-२५ मध्ये वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे झालेल्या ८५ प्रकरणांत शेतकऱ्यांना ४ लाख ६३ हजार १६९ रुपये नुकसानभरपाई मंजूर करून देण्यात आली.

पशुधन हानी

२८६ प्रकरणांत एकूण ३१ लाख ३१ हजार ८२५ रुपये पशुधन मालकांना देण्यात आले.

मनुष्यहानी

दोन व्यक्तींचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यांच्या वारसांना २० लाख रुपये तातडीची मदत देण्यात आली.

इतर सहाय्य

हल्ल्यात जखमी व इतर नुकसानग्रस्तांना ९ लाख ४५ हजार ९१४ रुपयांची मदत मंजूर झाली.

शेतकऱ्यांसाठी आधार

वन विभागाकडून दिली जाणारी भरपाई शेतकरी व पशुपालकांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. यामुळे पीडितांना तातडीने आर्थिक मदत मिळून संकटाचा सामना करण्यास हातभार लागतो. वन्यप्राणी आणि मानवातील संघर्षामुळे होणारे नुकसान या प्रक्रियेने काही प्रमाणात कमी होत असल्याचे विभागाने स्पष्ट केले.

शेतकऱ्यांसाठी सूचना

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतपिकांचे नुकसान झाले असल्यास, किंवा जखमी अथवा मृत्यूच्या घटना घडल्यास, नुकसानग्रस्तांनी आपले प्रस्ताव तत्काळ संबंधित वन परिक्षेत्र कार्यालयाकडे सादर करावेत. वेळेवर सादर केलेले प्रस्ताव लवकरात लवकर तपासून मदत दिली जाते.- अमोल गर्कळ, विभागीय वन अधिकारी, बीड

वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीवर नियंत्रण आणण्यासाठी शासन व वन विभाग सतत प्रयत्नशील आहेत. नुकसानग्रस्तांना वेळेवर दिला जाणारा आर्थिक आधार हा शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामस्थांसाठी मोठा दिलासा ठरत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Fishery Scheme : मत्स्यव्यवसायाला चालना; जाळी, होडी व साधनांवर मिळणार अर्थसाहाय्य वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रप्राणीशेतकरीशेती