सुनील घोडके
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजेराय, पळसगाव व भडजी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अक्षरशः मातीसह खरडून गेल्या.
शासनाने अशा प्रकारे खरडून गेलेल्या शेतजमिनींच्या दुरुस्तीसाठी हेक्टरी सुमारे तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली असली, तरी प्रत्यक्षात तीन महिने उलटूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. यामागचे मुख्य कारण म्हणजे पंचायत समितीतील रोहयो विभागाच्या तांत्रिक अधिकाऱ्यांनी अद्याप स्थळ पाहणीच न केल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
अतिवृष्टीत जमीनच वाहून गेली
खुलताबाद तालुक्यात २७ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे टाकळी राजेराय येथील कृष्णा महादू भागडे, निर्मला शिवाजी भागडे, पळसगाव येथील शंकर बेडवाल, भगवान बेडवाल, ज्ञानेश्वर तायडे, बाळू तायडे तसेच भडजी येथील अंबादास वाकळे या शेतकऱ्यांची शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात खरडून गेली होती.
काही ठिकाणी तर सुपीक माती वाहून जाऊन दगड, गोटे आणि खड्डेच उरले आहेत. या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने २८ सप्टेंबर रोजी पंचनामेही केले होते.
प्रस्ताव सादर, पण पुढे काहीच नाही
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाच्या निकषांनुसार ग्रामसभेचे ठराव, अहवाल आणि विविध नमुन्यातील प्रस्ताव वेळेत सादर केले. मात्र, प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामासाठी आवश्यक असलेले अंदाजपत्रक तयार करण्यासाठी तांत्रिक अधिकाऱ्यांची स्थळ पाहणीच झालेली नाही. त्यामुळे हे सर्व प्रस्ताव तीन महिने उलटूनही कागदोपत्रीच पडून असल्याची स्थिती आहे.
खरिपासोबत रब्बी हंगामही वाया
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा खरिपाचा हंगाम तर पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. त्यातच जमीन दुरुस्तीसाठी निधी न मिळाल्याने रब्बी हंगामातही पेरणी करता आली नाही. परिणामी, नुकसानग्रस्त शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
अतिवृष्टीत शेतजमीन खरडून गेली. खरिपाचे पीक गेलेच, पण जमीन दुरुस्तीसाठी निधी मिळाला नाही म्हणून रब्बी हंगामही हातचा गेला. शासनाने हेक्टरी तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे; पण तांत्रिक अधिकाऱ्यांनी अंदाजपत्रक तयार न केल्यामुळे आमचे प्रस्ताव धूळ खात पडून आहेत. - कृष्णा भागडे,नुकसानग्रस्त शेतकरी
बीडीओंच्या नोटिसांनाही केराची टोपली
या प्रकरणी गटविकास अधिकारी (बीडीओ) प्रकाश नाईक यांनी तांत्रिक अधिकाऱ्यांना वारंवार निर्देश दिले होते.
टाकळी राजेराय, पळसगाव आणि भडजी येथील शेतजमिनींची तातडीने स्थळ पाहणी करून अंदाजपत्रक तयार करण्याबाबत १ जानेवारी रोजी नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र, संबंधित तांत्रिक अधिकाऱ्यांनी या नोटिसांनाही जुमानले नसल्याचे समोर आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, काही अधिकारी इतके मुजोर झाले आहेत की बीडीओंच्या आदेशांनाही केराची टोपली दाखवली जात आहे.
नुकसानभरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करणार
संबंधित तांत्रिक अधिकाऱ्यांना सोमवारी पुन्हा बोलावून संबंधित गावांतील शेतजमिनींची स्थळ पाहणी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले जातील. तातडीने अंदाजपत्रक तयार करून त्याआधारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. - प्रकाश नाईक, गटविकास अधिकारी
शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी
तीन महिने उलटूनही मदत न मिळाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
“पीक नुकसानापेक्षा थेट जमीनच वाहून गेली असताना प्रशासनाकडून होणारी ही दिरंगाई अन्यायकारक आहे,” अशी भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. आता प्रशासन सोमवारी खरोखरच ठोस पावले उचलते की पुन्हा आश्वासनांपुरतेच प्रकरण मर्यादित राहते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.