Gahu Kadhani : सध्या गहू कापणी (Wheat Harvesting) सुरु आहे. अशातच शेतकऱ्यांनी कठोर परिश्रमाने लागवड केलेले हजारो एकर गहू पीक आगीत नष्ट होण्याच्या घटना घडत असतात. अशावेळी शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत वाया जाते.
गव्हाच्या पिकाला आग लागण्याची (Wheat Crop Fire) अनेक कारणे आहेत. यामध्ये गव्हाच्या शेतात इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरमधून लागलेली आग हे एक मोठे कारण आहे. अनेकदा ट्रान्सफॉर्मरमधील जुन्या आणि जीर्ण झालेल्या विजेच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट (Power Supply) झाल्यामुळे ठिणग्या निर्माण होतात, ज्यामुळे सुकलेले गवत किंवा पिकांना आग लागू शकते.
गहू पिकाला आगीचा धोका
- गव्हाच्या काढणीच्या हंगामात तापमान उष्ण असते, आजूबाजूला गवत सुकलेले असल्याने आगीचा धोका सुमारे ८० टक्क्यांनी वाढतो.
- अशा परिस्थितीत आग वेगाने पसरते. देशातील गव्हाच्या पिकाला लागणाऱ्या ६५ टक्के आगी प्रामुख्याने इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरमधील शॉर्ट सर्किटमुळे होतात.
- हे टाळण्यासाठी, जर गव्हाचे पीक काढणीला आले असेल आणि काही कारणास्तव कापणीला उशीर होत असेल, तर सर्वप्रथम गव्हाच्या शेतातील ट्रान्सफॉर्मरभोवती १० फूटांपर्यंतचे पीक काढून घ्या.
- याशिवाय, वीज विभागाला कळवून ट्रान्सफॉर्मर आणि वीज तारांची नियमितपणे तपासणी करा.
- जर तारा सैल झाल्या असतील किंवा जीर्ण झाल्या असतील तर ताबडतोब वीज विभागाला कळवा.
इतर कारणे
- साधारणतः गहू काढणी मशीनच्या साहाय्याने केली जाते. मशीनच्या सैल पट्ट्यामुळे ठिणग्या निघण्याचा धोका जास्त असतो, ज्यामुळे आग लागू शकते.
- बेल्ट नियमितपणे तपासा आणि तो योग्यरित्या घट्ट आहे का? याची खात्री करा.
- शिवाय मशीनच्या सायलेन्सरमधून निघणाऱ्या ठिणग्यांमुळेही आग लागू शकते. हे टाळण्यासाठी, ट्रॅक्टर किंवा कंबाईन ओव्हरलोड करू नका.
- सायलेन्सरचे तोंड नेहमी वरच्या दिशेने ठेवा, जेणेकरून ठिणग्या थेट जमिनीवर पडणार नाहीत.
- शेतात आग लागल्यास, ताबडतोब विझविण्यासाठी पाण्याच्या टाक्या आणि वाळूच्या पिशव्या उपलब्ध ठेवा.
- शेताभोवती ५-६ फूट रुंदीचा पट्टी (अग्निशामक रेषा) बनवा, जेणेकरून आग पसरण्यापासून रोखता येईल.
- ट्रॅक्टरच्या मागे डिस्क हॅरो किंवा रोटाव्हेटर लावून शेताच्या कडा नांगरून घ्या जेणेकरून आग एका शेतातून दुसऱ्या शेतात पसरणार नाही.