Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ustod Mahila Kamgar : जखमी मजुरांसाठी देवदूत ठरल्या 'आरोग्य साथी'; फडावरच सुरू झाली आरोग्य सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 10:41 IST

Ustod Mahila Kamgar : बीड जिल्ह्यातील ऊसतोड महिलांनी आता केवळ ऊस तोडण्यापुरती मर्यादा ठेवली नाही, तर त्या फडावरील मजुरांसाठी ‘डॉक्टर मॅडम’ बनल्या आहेत. ‘आरोग्य साथी’ योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या या महिला आता जखमी आणि आजारी मजुरांवर फडावरच प्राथमिक उपचार करत आहेत. बीडचा हा अभिनव उपक्रम आता संपूर्ण राज्यासाठी आदर्श ठरत आहे.(Ustod Mahila Kamgar)

सोमनाथ खताळ 

हातात कोयता, डोक्यावर उसाची मोळी आणि अंगावर कष्टांचे ओझे… हे चित्र बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या आयुष्याशी कायम जोडले गेले होते. 

मात्र आता हेच चित्र बदलताना दिसत आहे. ज्या महिलांनी आयुष्यभर ऊस तोडला, त्या महिलाच आता फडावर जखमी मजुरांची सेवा करत आहेत. 

हातात औषधपेटी घेऊन त्या मजुरांच्या जखमा साफ करत आहेत, ताप मोजत आहेत आणि गरजूंना प्राथमिक उपचार देत आहेत. त्यामुळे फडावर या महिलांची नवी ओळख तयार झाली आहे 'डॉक्टर मॅडम'.

ऊसतोड मजुरांच्या आरोग्याच्या गंभीर प्रश्नावर उपाय म्हणून सुरू करण्यात आलेली 'आरोग्य साथी' योजना आता स्थलांतरित मजुरांसाठी मोठा आधार ठरत आहे. फडावरच तातडीने उपचार मिळू लागल्याने अनेक आजारांचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

फडावरच मिळते प्राथमिक आरोग्य सेवा

ऊसतोड मजुरांना स्थलांतरामुळे गावापासून, दवाखान्यापासून आणि सरकारी आरोग्य यंत्रणेपासून दूर राहावे लागते. त्यामुळे किरकोळ आजारही गंभीर स्वरूप धारण करतात. 

अनेकदा उपचाराअभावी मजुरांची अवस्था बिकट होत होती. हीच समस्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने 'आरोग्य साथी' उपक्रम सुरू केला.

या योजनेअंतर्गत निवडक महिलांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना औषधपेटी, प्राथमिक उपचार साहित्य आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आले. 

आता या महिला फडावरच ताप, अंगदुखी, जुलाब, उलटी, निर्जलीकरण, त्वचारोग, खरुज, जखमा आणि पू येणे अशा विविध समस्यांवर उपचार करत आहेत.

जखमा स्वच्छ करणे, निर्जंतुकीकरण करणे, पट्टी बांधणे, ताप मोजणे आणि गरज पडल्यास रुग्णाला पुढील उपचारासाठी पाठवणे अशी महत्त्वाची जबाबदारी या महिला पार पाडत आहेत.

'आरोग्य साथी' महिलांमुळे मजुरांना मोठा दिलासा

ऊसतोड मजुरांचे जीवन अत्यंत कठीण असते. कडक उन्हात आणि प्रतिकूल परिस्थितीत काम करताना अनेकदा अपघात किंवा आजार उद्भवतात. 

अशा वेळी तातडीने उपचार मिळाल्याने मजुरांना मोठा दिलासा मिळत आहे. विशेषतः महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढू लागली आहे.

ऊसतोड मजूर महिलांच्या आरोग्यासाठी 'आरोग्य साथी' उपक्रम प्रभावी ठरत आहे. फडावरच उपचार मिळाल्याने आजारांचे प्रमाण कमी होत आहे. महिलांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.- डॉ. सचिन शेकडे, बालसंगोपन अधिकारी

'बीड पॅटर्न' ठरतोय राज्यासाठी दिशादर्शक

स्थलांतरित मजुरांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचा हा अभिनव प्रयोग आता राज्यासाठी आदर्श मानला जात आहे. प्रत्येक तालुक्यात जाऊन महिलांना प्रशिक्षण देण्यात आले असून, ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा हा नवा प्रयोग प्रभावी ठरत आहे.

पूर्वी आरोग्य यंत्रणेशी संपर्क तुटलेल्या मजुरांच्या झोपडीपर्यंत आता आरोग्य सेवा पोहोचू लागली आहे. त्यामुळे केवळ जीव वाचत नाहीत, तर मजुरांचा आत्मविश्वासही वाढत आहे.

७७० आरोग्य साथी फडावर कार्यरत

७ ऑगस्ट २०२५ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. आज जिल्ह्यात तब्बल ७७० आरोग्य साथी कार्यरत असून, मागील हंगामात १०७५ ऊसतोड कामगारांना फडावरच आरोग्य सेवा देण्यात आली आहे.

ऊसतोड मजुरांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरलेल्या या योजनेमुळे आता बीड जिल्ह्याचा 'आरोग्य साथी' पॅटर्न संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Ustod Kamagar : ऊसतोड कामगारांना मोठा दिलासा; सानुग्रह अनुदानात दुप्पट वाढ होणार वाचा सविस्तर

अधिक वाचा : Ustod Mahila Kamgar : ऊसतोड मजुरांच्या आरोग्यासाठी सरकार जागे; 'मिशन साथी' योजनेचा मोठा निर्णय वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : 'Arogya Sathi': Angel for injured sugarcane workers, healthcare on-site.

Web Summary : 'Arogya Sathi' scheme provides healthcare to sugarcane workers at the work site. Trained women offer first aid, reducing the severity of illnesses. The initiative boosts health awareness among laborers and is becoming a model for Maharashtra.
टॅग्स :शेती क्षेत्रऊसबीडशेतकरीशेती