Join us
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामात युरिया खताचा तुटवडा होणार नाही, पण... कृषी विभागाच्या शेतकऱ्यांना महत्त्वाच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 16:25 IST

Agriculture News : काही खत विक्रेत्यांकडून जाणीवपूर्वक टंचाईचे वातावरण निर्माण करून खतांची साठेबाजी केली जात असल्याचे समोर आले आहे.

जळगाव : इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात खतांचा तुटवडा भासणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरत आहेत. मात्र, जिल्हा परिषद कृषी विभागाने या चर्चाना पूर्णविराम दिला असून, जिल्ह्यात युरियाची कोणतीही टंचाई नसल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी अशा कोणत्याही चुकीच्या मेसेजला बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

जिल्हा कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, सद्यस्थितीत जिल्ह्यात ४४ हजार मेट्रिक टन युरियाचा साठा शिल्लक आहे. याव्यतिरिक्त, येत्या महिन्यात आणखी ११ हजार मेट्रिक टन युरियाचा साठा 'बफर स्टॉक' म्हणून राखून ठेवला जाणार आहे. त्यामुळे आगामी हंगामासाठी खतांची कमतरता भासण्याची कोणतीही शक्यता नाही.

काही खत विक्रेत्यांकडून जाणीवपूर्वक टंचाईचे वातावरण निर्माण करून खतांची साठेबाजी केली जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकाराची दखल घेत प्रशासनाने तपासणी मोहीम तीव्र केली असून, अमळनेर येथील एका खत विक्रेत्यावर साठेबाजी केल्याप्रकरणी नुकतीच कारवाई करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचनाअफवांकडे दुर्लक्ष करा : मेसेजची सत्यता पडताळल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका.अधिकृत दरानेच खरेदी : खत खरेदी करताना पक्की पावती मागा आणि छापील किमतीपेक्षा जास्त पैसे देऊ नका.थेट तक्रार करा : जर कोणताही विक्रेता युरिया उपलब्ध नसल्याचे सांगत असेल किंवा चढ्या दराने विक्री करत असेल, तर थेट जिल्हा कृषी विभागाकडे तक्रार नोंदवा.

जिल्ह्यात युरियाची कोणतीही कमतरता नाही. युद्धजन्य परिस्थितीचे भांडवल करून काही घटक अफवा पसरवत आहेत. शेतकऱ्यांनी अधिक दराने खत खरेदी करू नये किंवा घाबरून साठा करू नये.- पद्मनाभ म्हस्के, जिल्हा कृषी विकास अधिकारी

English
हिंदी सारांश
Web Title : No Urea Shortage in Kharif, But Farmers Need to Note This

Web Summary : Jalgaon assures sufficient urea stock for Kharif, dismissing shortage rumors. 44,000 metric tons are currently available, with 11,000 more in buffer. Farmers are advised to avoid panic buying, report overpricing, and verify information before believing rumors.
टॅग्स :शेती क्षेत्रखतेशेतकरीअमेरिका-इस्रायल-इराण वॉरशेती