Urea Shortage : रब्बी हंगामात युरिया खताच्या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेत शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा दीडपट दराने युरिया खताची विक्री करणाऱ्या एका कृषी सेवा केंद्रावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी धडक छापा टाकून युरिया काळाबाजार उघडकीस आणला. (Urea Shortage)
गोलटगाव येथील संबंधित कृषी सेवा केंद्रचालकाचा परवाना निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ओम साई कृषी सेवा केंद्र असे कारवाई करण्यात आलेल्या दुकानाचे नाव आहे. (Urea Shortage)
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांकडून युरियाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र मागणीच्या तुलनेत पुरवठा अपुरा असल्याने अनेक भागांत युरियाचा तुटवडा जाणवत आहे.
या परिस्थितीचा फायदा घेत ओम साई कृषी सेवा केंद्रचालक शासनाने निश्चित केलेली २६६ रुपयांची युरिया खताची गोणी तब्बल ४०० रुपयांना विक्री करत असल्याची तक्रार कृषी विभागाकडे दाखल झाली होती. विशेष म्हणजे याबाबत व्हिडीओ क्लिपसह तक्रार प्राप्त झाल्याने कृषी विभागाने तात्काळ दखल घेत कारवाई केली.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पी. आर. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय भरारी पथकाचे प्रमुख प्रकाश पाटील, तालुका कृषी अधिकारी मेघनाथ गुळवे, गुणनियंत्रण अधिकारी गोविंद पोळ आणि हरिभाऊ कातोरे यांच्या पथकाने गोलटगाव येथील ओम साई कृषी सेवा केंद्र तसेच संबंधित खत गोदामावर अचानक धाड टाकली.
तपासणीदरम्यान उपलब्ध खतसाठ्याची सखोल पाहणी करण्यात आली असता नोंदींमध्ये त्रुटी, दरफलकाचा अभाव तसेच शेतकऱ्यांकडून जादा दराने विक्री केल्याचे पुरावे आढळून आले.
या कारवाईदरम्यान काही शेतकऱ्यांचे लेखी जबाब घेण्यात आले. शेतकऱ्यांनी युरिया खत जादा दराने खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचे सांगितले. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे स्पष्ट झाले. युरियाचा तुटवडा असल्याने परिसरात काळाबाजार सुरू असल्याचेही या कारवाईत उघड झाले आहे.
सुनावणीनंतर अंतिम निर्णय
भरारी पथकाच्या कारवाईनंतर संबंधित कृषी सेवा केंद्रचालकाचा खत विक्रीचा परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
नियमानुसार संबंधित दुकानदाराला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जाणार असून, सुनावणीनंतर त्याचे म्हणणे असमाधानकारक आढळल्यास परवाना निलंबनासह कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जादा दराने खत विक्री केल्यास तात्काळ कृषी कार्यालयात तक्रार नोंदवावी. युरिया व इतर खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांवर अचानक तपासण्या सुरू ठेवण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Web Summary : A shopkeeper was arrested for selling urea at inflated prices. Authorities raided a shop in Golatgaon, seizing evidence of overcharging. License suspension is underway after farmers complained about exploitation during the Rabi season due to urea shortage.
Web Summary : यूरिया को बढ़ी हुई कीमतों पर बेचने के आरोप में एक दुकानदार को गिरफ्तार किया गया। अधिकारियों ने गोलटगाँव में एक दुकान पर छापा मारा, जहाँ अधिक कीमत वसूलने के सबूत मिले। रबी सीजन में यूरिया की कमी के कारण किसानों द्वारा शोषण की शिकायत के बाद लाइसेंस निलंबन की प्रक्रिया जारी है।