नाशिक : जिल्ह्यातील निफाड तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून बदलत्या हवामानामुळे द्राक्ष पिकांवर मोठा परिणाम झाला असून, कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार ३० ते ५० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि तापमानातील तीव्र चढ-उतार यामुळे द्राक्ष बागांमध्ये डाउनी मिल्ड्यू, भुरी यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला आहे. राज्य कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यात सुमारे २४८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून त्यात द्राक्ष पिकाचाही समावेश आहे. नुकसानीमुळे ५५९ शेतकरी प्रभावित झाले असून, निफाडसह दिंडोरी, सिन्नर, देवळा आदी तालुक्यांतील शेतकरी अडचणीत आले आहेत.
तज्ज्ञांच्या मते, गेल्या हंगामात मे ते नोव्हेंबरदरम्यान झालेल्या सततच्या पावसामुळे द्राक्ष उत्पादनात ४० ते ४५ टक्क्यांपर्यंत घट झाली असून, काही भागांत उत्पादन ५० टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. निफाड तालुक्यातील ओझर, पिंपळगाव बसवंत, उगाव, सायखेडा तसेच आसपासच्या गावांमध्ये द्राक्षबागांवर रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. काही ठिकाणी फळधारणा न होणे, तर काही ठिकाणी तयार घड सडणे व मणी तडकणे अशी स्थिती आहे.
सतत ढगाळ वातावरणामुळे फवारणीचे नियोजन विस्कळीत झाले असून, निर्यातक्षम द्राक्षांवरही परिणाम होत आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना तातडीने रोगनियंत्रण फवारणी, पाणी व्यवस्थापन व हवामान अंदाजानुसार उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, वाढत्या खर्चामुळे आणि घटलेल्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.
Web Summary : Nashik's grape farms in Niphad face 30-50% losses due to erratic weather, says agriculture department. Downy mildew and other diseases have spread rapidly, impacting yields and exports. Farmers are urged to implement immediate control measures to mitigate further damage.
Web Summary : नाशिक के निफाड में अनियमित मौसम से अंगूर के बागों को 30-50% नुकसान हुआ है, कृषि विभाग का कहना है। डाउनी मिल्ड्यू और अन्य रोग तेजी से फैले हैं, जिससे उपज और निर्यात प्रभावित हुए हैं। किसानों से तत्काल नियंत्रण उपाय लागू करने का आग्रह किया गया है।