Join us
Daily Top 2Weekly Top 5

Umed Scheme : राज्याचे 'बिझनेस मॉडेल'; 'उमेद'ने दिले महिलांच्या कर्तृत्वाला मोकळे आकाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 13:17 IST

Umed Scheme : राज्यातील ग्रामीण महिलांनी बचतगटांच्या माध्यमातून उद्योजकतेची नवी क्रांती घडवून आणली आहे. 'उमेद' अभियानामुळे राज्यातील तब्बल ७३ लाख महिलांनी व्यवसायाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले असून त्यापैकी २६ लाख महिला 'लखपती दीदी' बनल्या आहेत. बचतगटांच्या या यशामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी मिळत आहे. (Umed Scheme)

बालाजी देवर्जनकर

राज्याच्या ग्रामीण भागातील महिलांनी आता स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून उद्योजकतेची नवी क्रांती घडवून आणली आहे. (Umed Scheme)

राज्यातील तब्बल ७३ लाख महिलांनी 'उमेद' अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरणाचा नवा अध्याय लिहिला आहे. (Umed Scheme)

अवघ्या ५० लाखांच्या उलाढालीपासून सुरू झालेला हा प्रवास आता तब्बल ३० कोटी रुपयांच्या ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचला असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी मिळाली आहे.(Umed Scheme)

राज्यातील विविध जिल्ह्यांतील महिलांनी बचतगटांच्या माध्यमातून केवळ आर्थिक स्वावलंबन मिळवले नाही, तर स्वतः चे व्यवसाय उभे करून 'स्टार्टअप' संस्कृतीला ग्रामीण पातळीवर नवे रूप दिले आहे. (Umed Scheme)

'उमेद' अभियानाच्या माध्यमातून तयार झालेल्या ६.३० लाख बचतगटांमध्ये सुमारे ७३ लाख महिला सहभागी झाल्या आहेत. या महिलांनी एकत्र येत शेतीपूरक व्यवसाय, हस्तकला, अन्नप्रक्रिया, वस्त्रनिर्मिती, घरगुती उत्पादने यांसारख्या विविध क्षेत्रांत व्यवसाय उभे केले आहेत. (Umed Scheme)

'उमेद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश सगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील महिला बचतगटांनी उभारलेले हे मॉडेल आता एक यशस्वी बिझनेस मॉडेल म्हणून पुढे येत आहे.

महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या माध्यमातून या महिलांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली. सुरुवातीला या प्रदर्शनाची उलाढाल अवघ्या ५० लाखांपर्यंत मर्यादित होती.

मात्र महिलांच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनांमुळे आणि ग्राहकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे ही उलाढाल आता ३० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

४० टक्के नफा; ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना

बचतगटांच्या माध्यमातून सुरू असलेल्या व्यवसायांमध्ये महिलांनी व्यावसायिक दृष्टिकोन स्वीकारला आहे. एखादा गट वर्षभरात ५ ते ८ लाख रुपयांची उलाढाल करत असल्यास त्यापैकी जवळपास ४० टक्के हिस्सा हा निव्वळ नफा असतो.

हा नफा थेट महिलांच्या हातात जात असल्यामुळे ग्रामीण कुटुंबांची आर्थिक स्थिती मजबूत होत आहे. परिणामी, कुटुंबाची क्रयशक्ती वाढून ग्रामीण बाजारपेठांनाही चालना मिळत आहे.

२६ लाख 'लखपती दीदी'

या अभियानाचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे राज्यात २६ लाखांहून अधिक महिला 'लखपती दीदी' बनल्या आहेत. या महिलांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा अधिक झाले आहे.

बचतगटांच्या व्यवसायवृद्धीसाठी बँकांकडून मोठ्या प्रमाणावर कर्जही उपलब्ध करून देण्यात आले आहे. आतापर्यंत महिलांना सुमारे ४८ हजार कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले असून त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग व्यवसाय विस्तारासाठी होत आहे.

आर्थिक शिस्तीचे आदर्श मॉडेल

‘उमेद’ अभियानामुळे ग्रामीण महिलांमध्ये आर्थिक शिस्त आणि विश्वासार्हतेची नवी संस्कृती निर्माण झाली आहे. महिलांनी बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेत केल्यामुळे बँकांचा महिलांवरील विश्वास वाढला आहे. सध्या कर्ज परतफेडीचा दर ९८ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. मोठ्या उद्योगांच्या तुलनेतही हा दर उल्लेखनीय मानला जातो.

निर्णयक्षमता वाढली

बचतगटांमुळे महिलांच्या सामाजिक स्थानातही मोठा बदल झाला आहे. चूल आणि मूल या पारंपरिक चौकटीपलीकडे जाऊन महिला आता स्वतःच्या व्यवसायाचे निर्णय स्वतः घेत आहेत. उत्पादन, विक्री, गुंतवणूक आणि नफा यासंदर्भातील निर्णय प्रक्रियेत महिलांचा सक्रिय सहभाग वाढला आहे.

डिजिटल माध्यमातून जागतिक बाजारपेठ

'उमेद' अभियानाने महिलांच्या उत्पादनांना डिजिटल प्लॅटफॉर्मची जोड दिली आहे. ई-कॉमर्स संकेतस्थळे जसे की अमेझॉन, फ्लिपकार्ट तसेच ‘उमेद मार्ट’च्या माध्यमातून ग्रामीण उत्पादने आता देशभर आणि जागतिक बाजारपेठेत पोहोचत आहेत. यामुळे मध्यस्थांची साखळी कमी झाली असून उत्पादनाचा अधिक नफा थेट महिलांच्या हातात जात आहे.

अशी झाली प्रगती

महालक्ष्मी सरस प्रदर्शनाची उलाढाल : ५० लाखांवरून ३० कोटी

राज्यातील बचतगट : ६.३० लाख

सहभागी महिला : ७३ लाख

‘लखपती दीदी’ : २६ लाख महिला

बँक कर्ज : सुमारे ४८ हजार कोटी रुपये

कर्ज परतफेडीचा दर : ९८ टक्क्यांपेक्षा अधिक

'उमेद' अभियानामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण महिलांनी उद्योजकतेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आगामी काळात डिजिटल साक्षरता आणि ई-कॉमर्सच्या माध्यमातून या महिलांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा हा महिलांचा सहभाग आता राज्याच्या विकासाचा महत्त्वाचा आधार ठरत असल्याचे मत उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश सगर यांनी व्यक्त केले.

हे ही वाचा सविस्तर : Farmer Success Story : बारावी पास तरुणाची कमाल! मधमाशी पालनातून उभा केला कोट्यवधींचा स्टार्टअप

अधिक वाचा : Women Farmer Success Story : उच्चशिक्षित तरुणीची शेतीत गरूडझेप; एकरभरातून कमावले सात लाख रुपये वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra's women-led startup revolution: ₹30 crore turnover success!

Web Summary : Maharashtra's 'Umed' initiative empowers 73 lakh rural women, achieving ₹30 crore turnover. Self-help groups drive economic growth with impressive loan repayment and digital access, transforming rural livelihoods.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीमहिलासरकारसरकारी योजना