Join us

Tur Mar Rog : जमिनीतील वाढत्या आर्द्रतेने तुरीवर 'मर'; 'या' करा उपाययोजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 12:06 IST

Tur Mar Rog : अमरावती जिल्ह्यात सततच्या पावसाने आणि वाढत्या जमिनीतील आर्द्रतेमुळे खरीप पिकांवर संकट ओढावले आहे. तुरीच्या पिकावर 'मर' रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून, झाडांची पाने पिवळी पडून सुकू लागली आहेत. काही ठिकाणी झाडे जमिनीवरच वाळत असल्याचे चित्र दिसत आहे. कृषी तज्ज्ञांनी पाण्याचा निचरा करून त्वरित उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. (Tur Mar Rog)

Tur Mar Rog : ऑगस्टपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात खरीप पिकांची अवस्था गंभीर झाली आहे. विशेषतः तुरीच्या पिकावर 'मर' (फ्युजेरियम विल्ट) या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून, अनेक ठिकाणी तुरीची झाडे जाग्यावरच सुकू लागली आहेत. (Tur Mar Rog)

ढगाळ वातावरण आणि सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे जमिनीतील आर्द्रता वाढली असून, हीच परिस्थिती रोगासाठी अनुकूल ठरत आहे. (Tur Mar Rog)

तुरीच्या पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव

सुरुवातीला तुरीच्या झाडांची शेंड्याकडील पाने कोमेजतात, पिवळी पडून खाली झुकतात. काही दिवसांतच पाने सुकतात आणि संपूर्ण झाड वाळते.

झाडांच्या खोडांवर तपकिरी ते काळपट पट्टे दिसतात.

खोडाचा छेद घेतल्यास आतील भाग काळसर तपकिरी झालेला दिसतो.

रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेत झाल्यास संपूर्ण रोपे मरतात.

जमिनीपासून १० ते २० सेंमी उंचीवर खोडावर खोलगट चट्टे दिसतात, जे नंतर बुंध्याला पूर्ण वेढतात.

परिणामी झाड कमकुवत होऊन तुटते आणि संपूर्ण पीक वाळते.

अतिवृष्टी आणि ढगाळ हवामानाने बुरशी रोगांना खतपाणी

सातत्याने ढगाळ वातावरण, अतिवृष्टी आणि जमिनीतील जास्त आर्द्रता या परिस्थितीने फ्युजेरियम, रिझोक्टोनिया आणि फाइटोफ्थोरा सारख्या बुरशीजन्य रोगांना चालना दिली आहे. अमरावती जिल्ह्यातील हिरापूर, वरुड आणि दर्यापूर परिसरात तुरीची अवस्था बिकट झाली आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

कृषी विभागाने शेतकऱ्यांना तातडीने खालील उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

* शेतातील पाण्याचा निचरा करावा. ओलसर जमीन रोग वाढवते.

* वाफसा येताच कोळपणी व खुरपणी करावी, जेणेकरून जमिनीत हवा खेळती राहील.

* रोगग्रस्त झाडे काढून टाकावीत आणि शेजारच्या झाडांवर ट्रायकोडर्मा व्हिरीडी किंवा कार्बेन्डाझिम मिश्रणाची फवारणी करावी.

* भविष्यात बुरशीजन्य रोग टाळण्यासाठी पिक फेरपालट (Crop Rotation) अवलंबावा.

कपाशीवरही रोगांचा तडाखा

तुरीसह कापसालाही साचलेल्या पाण्याचा फटका बसला आहे. 

* शेतात ओल वाढल्याने पातेगळ, बोंडसड आणि आकस्मिक मर यांसारख्या समस्या उद्भवत आहेत. 

* या अवस्थेत कोणत्याही संप्रेरक (Hormone) फवारणीची घाई करू नये. 

* लवकरात लवकर पाण्याचा निचरा करून जमीन कोरडी करण्यावर भर द्यावा. वाफसा येताच कोळपणी व खुरपणी करावी.

तसेच अन्नद्रव्य व्यवस्थापनावर भर देऊन झाडांची वाढ आणि उत्पादन टिकवण्यावर लक्ष केंद्रित करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांची चिंता कायम

अतिवृष्टीमुळे तुरीचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. जमिनीत पाणी साचल्याने तुरीची झाडे मरतात, फुले आणि शेंगा निघण्याआधीच झाडे सुकतात, अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

जमिनीतील वाढती आर्द्रता आणि ढगाळ वातावरणामुळे खरीप हंगामातील तुरी व कपाशी पिके धोक्यात आली आहेत. योग्य वेळी निचरा, कोळपणी आणि रोगनियंत्रण उपाययोजना केल्यास शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानापासून दिलासा मिळू शकतो.

हे ही वाचा सविस्तर : Tur Pest Management : तूर पिकावर अळीचा हल्ला? शेतकऱ्यांसाठी तातडीचे उपाय जाणून घ्या

English
हिंदी सारांश
Web Title : Tur Crop Wilt: High Humidity Causes Damage; Implement These Measures

Web Summary : Excessive rain and humidity are causing wilt in Tur crops. Farmers are advised to drain water, aerate the soil, remove infected plants, and spray with Trichoderma viride or Carbendazim. Crop rotation is also recommended to prevent future fungal diseases. Cotton crops are also affected, emphasizing the need for drainage and nutrient management.
टॅग्स :शेती क्षेत्रतूरतुराशेतकरीशेतीखरीपअमरावती