Join us

Agriculture News : केळी पीक एकात्मिक व्यवस्थापन ते प्रक्रिया उद्योग, तोंडापूर केव्हीकेत प्रशिक्षण कार्यक्रम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 20:20 IST

Agriculture News : कृषि विज्ञान केंद्र तोंडापूर जि. हिंगोली आयोजित केळी-उत्तम कृषी पद्धतीबाबत प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.

Agriculture News :  आशिया विकास बँक अर्थसहाय्यित, महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्प मॅग्नेट, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे व कृषि विज्ञान केंद्र तोंडापूर जि. हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केळी-उत्तम कृषी पद्धतीबाबत प्रशिक्षण कार्यक्रम  संपन्न झाला. यावेळी केळी पिकाच्या एकात्मिक व्यवस्थापनासह केळी प्रक्रिया उद्योगाबद्दल उपस्थित अधिकारी वर्ग, तज्ञांनी अवगत केले. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष खा. शिवाजीराव माने यांनी शेतकरी उत्पादक कंपनीची शेतकऱ्यांनी स्थापन करावी, संघटित होऊन शेतकऱ्यांनी शेती करावी, नविन तंत्रज्ञानाचा अवलंबन करावा, हवामान बदल व ऐन वेळी येणारा पाऊसाचा फटका केळी उत्पादनाला बसत आहे. त्या अनुषंगाने हवामान सल्ले आपण नियमित बघावे, शेतकऱ्यांनी नवीन वाणाची निवड करावी, पिक फेरपालट, योग्य वेळेवर कीड व रोग व्यवस्थापन करुन शेती हा व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी बघावं असे मत व्यक्त केले. तर या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. पी. पी. शेळके म्हणाले की, केळीच्या बागा नियमित स्वछ ठेवाव्यात, व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या शंकेचे निरासन नियमित केले जात आहे. केळीच्या प्रत निर्यातीसाठी कशी असावी या विषय सविस्तर महिती दिली.

तसेच, अरुण नादरे यांनी मॅग्नेट प्रकल्पाचे मुख्य उद्देश, प्रमुख पिके, प्रकल्पाचे प्रमुख घटक, प्रकल्प अंमलबजावणी, प्रकल्पचा  आराखडा, घटाकासाठी मार्गदर्शक सूचना, शेतकरी उत्पादक संस्था पात्रता निकष, मूल्य साखळी गुंतवणूकदार निकष विषय सविस्तर माहिती दिली. तर नाबार्डचे अविनाश लहाने  यांनी कृषि विज्ञान केंद्र हे विस्तार कार्य हिंगोली जिल्ह्यात करत आहे. तसेच शेतकऱ्यांनी गरजे आधारित प्रशिक्षण नियमित केव्हीकेमधुन घेत राहावे. केळी पिकावर प्रकिऱ्या करून उद्योग करावे, असे माहिती दिली. तर रत्नराज काळे यांनी केळी अन्नद्रव्य व्यवस्थापन, यारा कंपनीचे विविध प्रॉडक्ट, केळीमध्ये येणाऱ्या अडचणी, खत व्यवस्थापन ज्यामध्ये खत कोणते द्यावे/कधी/प्रमाण/कशी द्यावी व त्याचा स्त्रोत विषय सविस्तर माहिती दिली.

या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये जळगांव येथील केळी संशोधन केंद्राचे वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. व्हि. टी. गुजर यांनी केळी पिकातील आव्हाने, बाजारभाव परिणाम, केळी पिकातील संधी, लागवड वेळ व पद्धत, अंतर, गादी वाफ लागवड पद्धत, जमिनीचे आरोग्य, खत व्यवस्थापन, बेणे प्रक्रिया, हिरवळीचे खत, आ्छादनामुळे होणारे फायदे, विविध खताचे लक्षणें व त्यावरील उपाय योजना, केळी पिकावरील विविध रोग व किडींची ओळख, रोगाची लागण तीव्र असेल तर पोगासड होणे व त्यावरील योग्य व्यवस्थापन, केळी मधील अंतर पिक, योग्य वेळेवर बांध स्वछ करणे विषय सखोल मार्गदर्शन करुन शेतकऱ्यांचे शंकेचे निरासन केले.

तर निवृत्त तालुका कृषि अधिकारी श्रीधर गावंडे यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेल्या शिफारशीचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा, शेतकऱ्यांनी गट शेतीकडे वळावे, योग्य वेळेवर पीक व्यवस्थापन व विक्री केल्यास केळी लागवड फायदेशीर ठरेल, तसेच केळी पिकामध्ये योग्य सिंचन पद्धतीचा वापर व केळीचे गड व्यवस्थापन याविषयी सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमास हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.   

टॅग्स :हिंगोलीशेती क्षेत्रकेळीजळगावशेती