Join us
Daily Top 2Weekly Top 5

Tendu Patta Season : जंगलात काम की मृत्यूचा धोका? मोहफुलं-तेंदूपत्ता वेचताना भीतीचं सावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 13:47 IST

Tendu Patta Season: आदिवासीबहुल भागात वनउत्पादनांचा हंगाम सुरू असताना स्थानिकांसाठी तो उपजीविकेचा नाही तर 'जीवन-मरणाचा' प्रश्न ठरत आहे. जंगलात वाढलेल्या वन्यप्राण्यांच्या धोक्यासोबतच रोजगाराची अनिश्चितता आणि हमीभावाचा अभाव यामुळे आदिवासी कुटुंबांवर मोठे संकट कोसळले आहे. या परिस्थितीत शासन आणि वनविभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

 Tendu Patta Season : आदिवासीबहुल भागात सध्या मोहफुलांचा हंगाम संपत असतानाच टोरी (चिरौंजी) आणि तेंदूपत्ता वेचण्याचा हंगाम सुरू होत आहे. (Tendu Patta Season)

या तीनही वनउत्पादनांवर स्थानिक आदिवासी कुटुंबांचा मोठ्या प्रमाणावर उदरनिर्वाह अवलंबून असतो. मात्र, यंदा या हंगामाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा, रोजगार आणि बाजारभाव या तिन्ही आघाड्यांवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.(Tendu Patta Season)

नागलवाडी, सालेघाट आणि कोलीतमारा या वनपरिक्षेत्रांतील आदिवासी नागरिक दरवर्षीप्रमाणे जंगलात जाऊन मोहफुले, टोरी आणि तेंदूपत्ता गोळा करतात. मात्र, जंगलात वाढलेला वन्यप्राण्यांचा वावर त्यांच्या जीवाला धोका निर्माण करत आहे.(Tendu Patta Season)

वाघ, बिबट्या आणि अस्वल यांसारख्या हिंस्त्र प्राण्यांची संख्या वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

अशा परिस्थितीत वन विभागाकडून गस्त पथके, सतर्कता सूचना किंवा तात्पुरती सुरक्षा यंत्रणा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याची तक्रार स्थानिकांकडून केली जात आहे.

रोजगाराच्या संधींचा अभाव

या हंगामात वनविभागाकडून स्थानिकांना रोजगार मिळेल, अशी अपेक्षा असते. मात्र, यंदा अनेक ठिकाणी तेंदूपत्ता तोडणीसाठी मजूर नोंदणी, वेतन दर निश्चिती आणि वेळेवर मोबदला याबाबत स्पष्टता नसल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

परिणामी, अनेक आदिवासी कुटुंबांना गाव सोडून इतर ठिकाणी मजुरीसाठी जावे लागत आहे.

कोलीतमारा भागात वाढता संघर्ष

पश्चिम पेंच क्षेत्रातील कोलीतमारा वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांचा वावर अधिक वाढल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.

रानगवे, वाघ, बिबट आणि अस्वल यांच्या उपस्थितीमुळे वनाधारित उपजीविका धोक्यात आली आहे. त्यामुळे स्थानिकांना पर्यायी रोजगार शोधण्याची वेळ आली आहे.

वनउत्पादनांना हमीभावाची मागणी

मोहफूल आणि टोरीला बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने आदिवासी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत.

व्यापाऱ्यांकडून कमी दरात माल खरेदी केल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. त्यामुळे शासनाने या वनउत्पादनांसाठी हमीभाव निश्चित करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

वन विभागाची भूमिका

नागलवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण लेले यांनी सांगितले की, या भागात नियमित जनजागृती मोहीम राबवली जाते आणि वनहक्कांविषयी नागरिकांना माहिती दिली जाते. मात्र, स्थानिकांच्या मते प्रत्यक्ष पातळीवर सुरक्षा आणि रोजगाराच्या बाबतीत अधिक ठोस उपाययोजना गरजेच्या आहेत.

संवेदनशील क्षेत्रातील वाढती चिंता

नागलवाडी वनपरिक्षेत्र हे पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणारे संवेदनशील क्षेत्र आहे. बनेरा, पेंचकुकडा, नरहर, सुरेरा, महकेपार, कोलीतमारा, ढवळापूर, शिलादेवी, अंबाझरी आदी गावांमध्ये वन्यप्राण्यांचा वाढता वावर नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

सालेघाट वनपरिक्षेत्रही जैवविविधतेने समृद्ध असून येथे वन्यजीवांचे अधिवास मोठ्या प्रमाणात आहेत.

तातडीच्या उपाययोजनांची गरज

स्थानिकांच्या मते, सध्याच्या परिस्थितीत खालील बाबींवर तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.

जंगलात जाणाऱ्या नागरिकांसाठी सुरक्षा उपाययोजना

तेंदूपत्ता व इतर वनकामांसाठी नियोजित रोजगार

वनउत्पादनांना हमीभाव व पारदर्शक बाजारव्यवस्था

वेळेवर मजुरी आणि नोंदणी प्रक्रिया

वनउत्पादनांचा हंगाम हा आदिवासींसाठी जीवन-मरणाचा प्रश्न ठरत असून, शासन आणि वनविभागाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा सविस्तर : Electricity Bill Problems : वीजबिल अचानक वाढलं? स्मार्ट मीटर नव्हे; 'हे' आहे खरे कारण

अधिक वाचा : Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana : सावधान! विमा कंपनी पैसे अडवत असेल? मग ग्राहक आयोगाचा ‘हा’ निर्णय तुमच्यासाठीच!

English
हिंदी सारांश
Web Title : Tendu Leaf Season: Livelihood or Death? Fear Grips Forest Gatherers

Web Summary : As the Tendu leaf season begins, tribal communities face threats from wild animals and uncertain wages. They seek safety measures, fair compensation, and guaranteed prices for forest products to secure their livelihoods.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेती