Join us
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखाने शेतकऱ्यांकडचा कोवळा ऊस का तोडून नेत आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 16:25 IST

गाळपासाठी ऊस कमी पडत असल्यामुळे कारखान्यांनी दुसऱ्या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाची पळवापळवी सुरू केली आहे.

बीड : यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पावसाच्या भरोशावर मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली. परंतु, पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे उसाचे उत्पादन घटले आहे. आता साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. मात्र, गाळपासाठी ऊस कमी पडत असल्यामुळे कारखान्यांनी दुसऱ्या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाची पळवापळवी सुरू केली आहे. त्यामुळे कारखान्याचे कर्मचारी पाहुण्यांचे पाहुणे शोधून ऊस मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. जो कारखाना जास्त दर देईल, त्यालाच ऊस देणार असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. 

दरम्यान उसाची पेरणी केल्यानंतर विहीर व बोअरला पाणी कमी होते. त्यानंतर पावसाळ्यात विहिरींना पाणी येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नाही. परिणामी उसाला पाणी कमी पडल्यामुळे उसाची वाढ खुंटली. वाढ खुंटलेल्या उसाचा शेतकऱ्यांनी ओला चारा म्हणून वापर केला. यंदा पाण्याअभावी उसाचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे कारखान्यांना ऊस मिळत नाही, या वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे पुढील वर्षीं लागवड कमी होईल. तसेच यंदा लागवड कमी झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे. शेतकरी मागील वर्षीचा खोडवा ठेवणार नाही. त्यामुळे पुढील वर्षीही उसाची टंचाई निर्माण होणार आहे.

उसाला परिपक्चता येण्याआधीच तोडणी

ऊस मिळविण्यासाठी साखर कारखान्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे बहुतांश कारखाने ऊस परिपक्च होण्याआधीच ऊस तोडून नेत आहेत. कोवळा ऊस तोडून नेल्यामुळे साखरेच्या उताऱ्यावर परिणाम होत आहे. परंतु, आपल्याच कारखान्याचे जास्तीत जास्त गाळप व्हावे, यासाठी अपरिपक्व ऊसही तोडत आहेत. सध्या राज्यासह परराज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील मजूर ऊसतोडीसाठी इतर भागात गेले आहेत. त्यामुळे ऐनवेळेवर ऊसतोडीसाठी मजूर मिळत नाहीत. वाढीव दर देऊन आणलेले मजूर इतरत्र जाऊ नयेत, यासाठी शेतकरी अधिकारी ऊसतोडणी मजुरांच्या टोळ्यांसोबत दिसून येतात.

ऊसाला दर काय? 

गढी : गेवराई तालुक्यातील जयभवानी सहकारी साखर कारखान्याने उसाला प्रतिटन 2700 रुपयांपर्यंत दर जाहीर केलेला आहे. तालुका परिसरात तीन खासगी कारखाने आहेत. या कारखान्यांनीही जवळपास 2700 रुपये दर जाहीर केलेला आहे. केज : गंगाई साखर कारखान्याने उसाला प्रतिटन 2700 रुपये दर जाहीर केलेला आहे. तसेच येडेश्वरी साखर कारखान्याने 2750 दर जाहीर केला आहे. तालुक्यातील गुऱ्हाळ सुरु होण्याच्या मार्गावर असून, त्यांच्याकडून उसाची मागणी होत आहे.  माजलगाव/धारूर : लोकनेते स्व. सुंदरराव सोळंके सहकारी सास्वर कारखान्याने उसाला प्रतिटन 2700 ते 2900 रुपयांपर्यंत दर जाहीर केलेला आहे. तालुका परिसरात चार खासगी कारखाने असून, कारखानदारांनी उसाला 2700 रुपयांपेक्षा जास्त भाव दिला.

पुन्हा बॉयलर पेटवले खर्चिक

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होण्याआधी बॉयलर पेटवावे लागते. एकदा पेटलेले बॉयलर गळीत हंगाम संपेपर्यंत बंद करता येत नाही. विझवलेले बॉयलर पुन्हा पेटवणे कारखान्यांना खर्चिक पडते. चोवीस तास बॉयलर चालू ठेवण्यासाठी त्यात ऊसाचा भुसा टाकावा लागतो, त्यामुळे कारखान्यांना ऊसाचा साठा गरजेचा असतो.

नोंद एकीकडे, ऊस दुसरीकडे

एका कारखान्याकडे करार केलेला ऊस दुसराच कारखाना तोडून नेत आहे. उसाची कमतरता अशीच राहिली तर कारखाने चालविणे अवघड होऊन बसणार आहे. भविष्यात कार्य- क्षेत्राबाहेरील ऊस घेण्यास कारखान्याना बंदी घालण्याची वेळ येणार आहे. 

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीबीडऊससाखर कारखाने