गोंदिया : 'घरट्याची वीण घट्ट; पण जगणं अवघड...' ही ओळ आज सुगरण पक्ष्याच्या वास्तव स्थितीचे अत्यंत प्रत्ययकारी चित्र उभे करते. कला व सुबकतेचे प्रतीक असलेला सुगरण पक्षी (Sugaran Pakshi) हळूहळू कालबाह्य होत चालला आहे. पूर्वी गावागावांमध्ये, जंगलाच्या कडांवर किंवा ओढ्याच्या काठावर काटेरी झाडांवर लटकणारी त्याची सुबक घरटी आता दुर्मीळ होत चालली आहेत.
गत काही वर्षांपासून निसर्गाचा (Nature) समतोल ढासळत आहे. वनसंपत्तीचा ऱ्हास, भूजल पातळीतील घट आणि हवामानातील बदल (Climate Change) यामुळे अनेक पक्ष्यांच्या प्रजातींना अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यात सुगरण पक्ष्याचेही नाव समाविष्ट झाले आहे. सुगरण पक्षी बहुधा मे ते सप्टेंबर या कालावधीत घरटी बांधतो.
गवत, लाकडी तुकडे, पालापाचोळा अशा सामग्रीचा वापर करून तो आपल्या चोचीने कलात्मक आणि मजबूत घरटे उभारतो. ही घरी मुख्यतः झाडांच्या उंच फांद्या किंवा विहीरीच्या कडांवर दिसून येतात मात्र, अलीकडील काळात हे चित्र बदलले आहे
निसर्ग संवर्धनाची गरजसुगरण पक्ष्याचे अस्तित्व हे निसर्गाच्या आरोग्याचे द्योतक आहे. त्याच्या घरट्यांची बांधणी ही एक जीवनकला असून, ती निसर्गाची सौंदर्यदृष्टी दाखवते. त्यामुळेच, बदलत्या हवामान आणि मानवी हस्तक्षेपाच्या पार्श्वभूमीवर या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना हवी.
कृषी पद्धतीतील बदल ठरतोय धोकादायकशेतीमध्ये रासायनिक कीटकनाशकांचा वाढता वापर देखील पक्ष्यांच्या अन्नसाखळीवर परिणाम करत आहे. सुगरण पक्षी कीटकांवर उपजीविका करतो. मात्र, रासायनिक फवारणीमुळे कीटकांची संख्या घटली असून, यामुळे या पक्ष्यांना अन्न मिळवणे कठीण झाले आहे. परिणामी, त्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.
पूर्वी पूर्वी जंगलात काटेरी झाडावर ओढा नाल्याच्या काठावर सुगरण पक्ष्यांची घरटी असायची, आजही सुगरण पक्षी अस्तित्वात आहेत; परंतु पूर्वीच्या प्रमाणात परिसरात कमी झाले आहेत. एप्रिल ते जूनपर्यंत सुगरण पक्षी घरटी बांधतात, शिवाय उपजाती स्थलांतरित होतात. मात्र, चिमण्यांची संख्या घसरणीवर आली आहे, त्यामुळे त्यांची जपणूक करणे गरजेचे आहे.- रूपेश निंबार्ते, पक्षीमित्र