Join us

Agriculture News : साखरेचे प्रमाण मोजण्याचे तंत्रज्ञान दोन खासगी संस्थांना हस्तांतरित, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 15:06 IST

Agriculture News : ब्रिक्स मापन तंत्रज्ञान ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाचा रस अधिक अचूक आणि कार्यक्षमतेने तयार करायला उपयोगी ठरेल.

Agriculture News : सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च (SAMEER), या भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या संशोधन आणि विकास संस्थेने, ब्रिक्स या मायक्रोवेव्ह आधारित मापन प्रणालीच्या मोठ्या प्रमाणातील उत्पादनासाठी, तोष्णीवाल हायवाक प्रायव्हेट लिमिटेड, आणि सर ऑटोमेशन इंडस्ट्रीज यांच्याबरोबरच्या तंत्रज्ञान हस्तांतरण  करारावर स्वाक्षरी केली. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन यांच्या उपस्थितीत आज मुंबईत तंत्रज्ञान हस्तांतरण पार पडले.

शुगर कंटेंट मेजरमेंट (SCORE), अर्थात साखरेचे प्रमाण मोजण्याच्या प्रणालीचे हे अत्याधुनिक तंत्रज्ञान दोन खासगी उद्योग भागीदारांना हस्तांतरित करण्यात आले, जेणेकरून या प्रणालीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करता येईल. मायक्रोवेव्ह-आधारित ब्रिक्स ही नाविन्यपूर्ण मापन प्रणाली, समीर (SAMEER) द्वारे डिझाइन आणि विकसित करण्यात आली असून, ती साखर कारखान्यांमध्ये साखरेच्या उत्पादनादरम्यान, साखरेची संपृक्तता (ब्रिक्स) मोजण्यासाठी जलद, स्थिर आणि अचूक पद्धत प्रदान करते.

 ऊस उत्पादकांना उपयुक्त 

उपस्थितांना संबोधित करताना माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव म्हणाले की, SAMEER ने विकसित केलेले मायक्रोवेव्ह-आधारित ब्रिक्स मापन तंत्रज्ञान ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाचा रस अधिक अचूक आणि कार्यक्षमतेने तयार करायला उपयोगी ठरेल. स्वतःच्या IP सह कृषी क्षेत्राबरोबरच आयसीटीच्या सर्व क्षेत्रांमध्ये स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याला माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे प्राधान्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

ब्रिक्स तंत्रज्ञानाची तपासणी आणि चाचण्या 

SAMEER चे महासंचालक डॉ. पी. हनुमंत राव म्हणाले की, भारतातील कृषी आणि औद्योगिक अन्न प्रक्रिया क्षेत्रासाठी मायक्रोवेव्ह तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या SAMEER च्या प्रयत्नांमधील हा एक महत्वाचा टप्पा आहे. हा कार्यक्रम नवोन्मेशी प्रयोग आणि प्रभावासाठी SAMEER च्या संशोधन चमू कडून, उद्योग भागीदार आणि लाभधाराकांकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे यशस्वी हस्तांतरण अधोरेखित करतो. या तंत्रज्ञानामध्ये साखर उद्योगात क्रांती घडवण्याची क्षमता आहे, असेही ते म्हणाले. ब्रिक्स तंत्रज्ञानाची तपासणी आणि चाचण्या पुणे येथील संत तुकाराम साखर कारखान्यात पार पडल्या, आणि पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने त्याला प्रमाणित केले.

टॅग्स :साखर कारखानेऊसशेती क्षेत्रशेती