Join us

पीएम किसानच अनुदान बंद झालंय, अहमदनगरमधील शेतकऱ्यांनी काय केलं पहा! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 10:45 IST

दोन वर्षांपासून पीएम किसान योजनेच्या अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांचे अनुदान पुन्हा सुरू करण्यात आले आहे. 

पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची रक्कम वर्षाकाठी प्राप्त होत असते. मात्र काही शेतकरी अनुदानापासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे. कागदपत्रे, केवायसी यासह संबंधित योजेनबाबत असलेल्या अडचणींमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित आहेत. पीएम किसान योजनेचे गेली दोन वर्षांपासून अनुदानापासून वंचित असलेल्या १४८ शेतकऱ्यांना पात्र ठरवून त्यांचे अनुदान पुन्हा सुरू करण्यात यश आले आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील नथूपाटलाचीवाडी व रामपूरवाडी या दोन गावांतील जमीन धारकांपैकी नथूपाटलांच्या वाडीत १४७, रामपूरवाडी ६७ शेतकऱ्यांच्या जमिनी पुणतांबा शिवारात दाखविल्याने हे शेतकरी पीएम किसान यादीत दिसत नव्हते. या शेतकऱ्यांचे लैंड सिडिंगसुद्धा पीएम किसान पोर्टल नसल्याने यांचे अनुदान बंद झाले. हे लँड सिडिंग राहाता तहसीलदार यांनी करून घेतले. तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून सदरील अपात्र शेतकरी लाभार्थी यांचे अर्ज वरिष्ठ पातळीवर संपर्क साधून मार्गी लावले. 

दरम्यान जमिनी पातळीवर सदरील काम मार्गी लावण्यासाठी नपावाडीचे कृषी सहायक किरण धुमाळ यांनी शेतकरी बांधवांचे अर्ज स्वीकारणे, ऑनलाईन करणे व ते अर्ज पात्र करून घेत शेतकऱ्यांचे अनुदान सुरू झाले. त्याबद्दल ग्रामस्थ बांधवांनी तालुका कृषी अधिकारी भोरे, कृषी सहायक किरण धुमाळ, महसूलचे संदीप सापते यांचा सत्कार केला. कोणीही शेतकरी सदरील पीएम किसान सन्मान निधी योजनेतून वंचित राहणार नाही, अशी हमी दिली. 

शेतकऱ्याचा बायोडाटा तयार करणे महत्वाचं 

शेतकरी खंडेराव वहाइने म्हणाले की, सरकारी योजनेसाठी प्रत्येक वेळेस शेतकऱ्याकडून कागदपत्रे घेतात, त्याऐवजी शेतकऱ्याचा बायोडेटा सरकारी कार्यालयात तयार केला तर अशी परिस्थिती येणार नाही. प्रत्येक वेळी कागदपत्रे जमा करून सरकारी कार्यालयात चकरा मारून शेतकरी मेटाकुटीला येतो. तर प्रांताधिकारी माणिकराव आहेर म्हणाले की, पीएम किसान विभाग तहसीलदार पाहतात, या घटनेची मला कल्पना नाही. याबाबत सविस्तर माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाअहमदनगर