Join us
Daily Top 2Weekly Top 5

10 फेब्रुवारीपासून महिला शेतकऱ्यांसाठी विशेष राज्यव्यापी -महाविस्तार-AI मोहीम, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 19:30 IST

Mahavistar-AI : महाविस्तार-AI द्वारे महिला शेतकऱ्यांचा डिजिटल समावेश" ही विशेष राज्यव्यापी मोहीम राबविण्यात येणार आहे. 

Mahavistar-AI : आंतरराष्ट्रीय महिला वर्ष आणि मुंबई येथे होणाऱ्या आगामी 'ॲग्री-एआय (Agri-Al) शिखर परिषद" याच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील महिला शेतकऱ्यांचा डिजिटल समावेश वाढविण्यासाठी दिनांक १० ते १४ फेब्रुवारी या कालावधीत -"महाविस्तार-AI द्वारे महिला शेतकऱ्यांचा डिजिटल समावेश" ही विशेष राज्यव्यापी मोहीम राबविण्यात येणार आहे. 

शेती आणि सलग्न कामामध्ये महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असले तरी, वेळेवर आणि विश्वासार्ह कृषी माहितीपर्यंत त्याचा पुरेसा पोहोच होत नाही. ही दरी भरून काढण्यासाठी शासनाच्या महाविस्तार-AI (MahaVISTAAR-AI) शेतकरी अॅपचा प्रभावी वापर महिला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

महाविस्तार-AI ॲपद्वारे पीक अवस्था निहाय सल्ला, स्थानिक हवामान आधारित मार्गदर्शन, कीड व रोगांवरील इशारे तसेच एआय-सक्षम चॅटबॉटच्या माध्यमातून सोप्या भाषेत कृषी सल्ला उपलब्ध करून देण्यात येतो. कीड-रोग ओळखीसाठी छायाचित्र आधारित प्रणाली आणि व्हॉईस-आधारित सेवा विकसित होत असून, त्यामुळे महिला शेतकऱ्याऱ्यांसाठी ॲपचा वापर अधिक सुलभ होणार आहे. 

या मोहिमेदरम्यान प्रत्येक गावात महिला शेतक-यांसाठी विशेष प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येणार असून, जमीन मालकी हक्क विचारात न घेता शेती किंवा संबंधित कृषी कामात सहभागी असलेली कोणतीही महिला शेतकरी म्हणून पात्र राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

स्मार्टफोन नसलेल्या महिलांसाठी गट-आधारित प्रशिक्षण, कृषी ताई, कृषी सखी, पशु सखी, महिला बचत गटाचा सहभाग, महिला सस्था, पोक्रा व इतर योजनांच्या शेतीशाळा, कृषी व विज्ञान महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहभागाच्या माध्यमातून मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. तसेच महिला शेतकऱ्यांच्या वेळेनुसार कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार आहे. 

याशिवाय, महाविस्तार-AI ॲपवरील माहिती सांगणारे लघु व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केले जाणार आहेत. या उपक्रमामुळे राज्यातील महिला शेतकऱ्यांचा अर्थपूर्ण डिजिटल समावेश साध्य होईल, असा विश्वास जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी व्यक्त केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Statewide MahaVistar-AI Campaign for Women Farmers Starts February 10

Web Summary : A statewide MahaVistar-AI campaign aims to digitally empower women farmers from February 10-14. The initiative focuses on providing crucial agricultural information and AI-enabled support through the MahaVistar-AI app, offering weather updates, pest control advice, and easy-to-understand guidance. Special demonstrations and training sessions will be conducted across villages.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतीकृषी योजना