Join us
Daily Top 2Weekly Top 5

Soybean Kharedi : नोंदणी करूनही सोयाबीन खरेदी नाही; काय आहे कारण वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 14:19 IST

Soybean Kharedi : शासनाच्या हमीभावाचा लाभ मिळावा म्हणून नाफेडमार्फत ऑनलाइन नोंदणी केलेल्या तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन अद्याप खरेदी झालेले नाही. ग्रेडर उपलब्ध नसल्याने नाफेड केंद्रावर खरेदी प्रक्रिया रखडली असून, वारंवार बाजार समितीचे फेरे मारावे लागत असल्याने शेतकरी आर्थिक नुकसानीला सामोरे जात आहेत. (Soybean Kharedi)

Soybean Kharedi : शासनाने सोयाबीनसाठी जाहीर केलेला किमान आधारभूत दर (हमीभाव) मिळावा, यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाफेडमार्फत ऑनलाइन नोंदणी केली आहे. (Soybean Kharedi)

मात्र, तेल्हारा येथील नाफेड खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदी रखडल्याने शेतकरी अडचणीत सापडले असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (Soybean Kharedi)

नोंदणी करूनही ग्रेडर अभावी खरेदी प्रक्रिया ठप्प असल्याने नोंदणी केलेले सोयाबीन तातडीने खरेदी करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. (Soybean Kharedi)

ग्रेडरअभावी खरेदी ठप्प

तालुक्यातील इतर नाफेड केंद्रांवर सोयाबीन खरेदी सुरू असताना तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत असलेल्या नाफेड केंद्रावर मात्र ग्रेडर उपलब्ध नसल्याने खरेदी थांबली आहे.

नोंदणी केलेले शेतकरी दररोज नमुन्यासाठी सोयाबीन घेऊन केंद्रावर येत आहेत. काही शेतकरी ट्रॅक्टर-ट्रॉलीतून सोयाबीन आणत असतानाही ग्रेडर येथे न थांबल्याने खरेदी होत नाही. परिणामी शेतकऱ्यांना वारंवार परत जावे लागत असून वाहतूक खर्च, वेळेचा अपव्यय आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

निवेदनावर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या

या संदर्भात सादर करण्यात आलेल्या निवेदनावर प्रमोद गावंडे, गणेश ढोले, नीलेश आखरे, दिनकर काकड, संदीप ढोले, संतोष रोठे, अजाबराव डेरे, नारायण बिहाडे, ज्ञानेश्वर खाडे, प्रकाश नेमाडे, पुरुषोत्तम ताथोड यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

ग्रेडरबाबत तक्रारींचा सूर

पणन महासंघाने नेमून दिलेल्या ग्रेडरबाबत शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. योग्य दर्जाचे सोयाबीन असूनही 'निकृष्ट' असल्याचे कारण देत माल परत पाठविला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

आतापर्यंत दोन ग्रेडर बदलण्यात आले असून, मंगळवारपर्यंत तिसरा ग्रेडर उपलब्ध झाल्यानंतर खरेदी सुरू होईल, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम घोंगे यांनी दिली आहे.

नियोजनाअभावी शेतकऱ्यांची भटकंती

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना जर वेळेत संदेशाद्वारे माहिती दिली असती, तर ते तालुक्यातील इतर केंद्रांवर सोयाबीन मोजणीसाठी जाऊ शकले असते. मात्र बाजार समितीकडून कोणतेही नियोजन न झाल्याने शेतकरी सध्या वणवण भटकत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन तातडीने खरेदी करावे, अशी जोरदार मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

त्वरित खरेदी सुरू करण्याची मागणी

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या सभापतींची भेट घेऊन नाफेड केंद्रावर सोयाबीन खरेदी न झाल्याची व ग्रेडरच्या मनमानीबाबत तक्रार केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन देण्यात आले.

मात्र, त्यानंतर कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने बाजार समिती या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे लक्ष

तेल्हारा येथील नाफेड केंद्रावर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी न झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. लोकप्रतिनिधींकडूनही या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी करीत असून, त्यांच्या अडचणी ऐकून घेण्यास चालढकल सुरू असल्याने नाराजी वाढली आहे.

आता बाजार समिती कोणती ठोस कार्यवाही करते आणि लोकप्रतिनिधी कोणती भूमिका घेतात, याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा सविस्तर : NAFED Soybean Kharedi : 'नाफेड'च्या खरेदी प्रक्रियेत सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean Purchase Stalled Despite Registration; Farmers Anxious in Telhara

Web Summary : Farmers in Telhara face hardship as soybean purchases stall at the NAFED center due to grader unavailability, despite prior registration. They demand immediate resumption of procurement, citing financial losses and wasted time, while alleging irregularities in quality assessment.
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनशेतकरीशेतीबाजार