Join us

Soybean Harvest : अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेल्या सोयाबीन काढणीला आला वेग वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 11:41 IST

Soybean Harvest : मराठवाड्यात या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे. पावसाने सोयाबीन आणि कपाशी पिकांचे मोठे नुकसान केलं असून, आता काढणीच्या काळात उत्पादन घटल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. हमीभाव मिळत नसल्याने आणि खर्चही परत न येत असल्याने शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडले आहेत. (Soybean Harvest)

Soybean Harvest : मराठवाड्यातील परतूर तालुक्यात या वर्षी झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी कोलमडली आहे. पावसाने पिकांची अशी दैना केली की, उभं पिकं सडून गेलं, मुळासकट उखडलं आणि आता जे काही थोडं शिल्लक राहिलं आहे तेही कमी उताऱ्याचं आणि कमी भावाचं ठरत आहे. (Soybean Harvest)

सध्या तालुक्यात सोयाबीनकाढणीला वेग आला असला तरी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही. उत्पादनात मोठी घट झाल्यामुळे एकरी फक्त दोन ते तीन क्विंटलच उतारा मिळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी हवालदिल झाले असून, काढणीचा खर्चही निघत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. (Soybean Harvest)

अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालं खरीप हंगामाचं गणित

या वर्षी परतूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि कपाशीची लागवड करण्यात आली होती. मात्र, सलग पाऊस आणि ओलसर हवामानामुळे पिकांवर बुरशी, सड आणि पानगळ यांचा प्रादुर्भाव झाला.

अनेक शेतांमध्ये पिकं पूर्णपणे सडून गेली, तर काही ठिकाणी पिकं मुळासकट उखडून गेली. परिणामी शेतकऱ्यांना एकरी उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट सहन करावी लागत आहे.

२० हजार रुपयांचा खर्च; पण हातात काहीच नाही

सोयाबीनच्या एकरी लागवडीसाठी सुमारे २० हजार रुपये खर्च येतो.

प्रकारखर्च (रु.)
बियाणे४,०००
खते२,०००
फवारणी२,०००
खुरपणी२,०००
पेरणी३,०००
मळणी१,५००
वाहतूक५००
कापणी५,०००
एकूण खर्च२०,००० रुपये

सध्या सोयाबीन बाजारात हमीभावापेक्षा कमी दराने विकले जात असल्याने, शेतकऱ्यांना काढणीचा खर्चही परत मिळत नाही.

शेतकरी काय सांगतात?

एकरी दोन ते तीन क्विंटलच उतारा मिळतोय. पेरणीपासून ते काढणीपर्यंत सगळा खर्च खिशातून करावा लागतोय. सरकारने पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी.- मुंजाभाऊ चव्हाण, शेतकरी

सोयाबीन आणि कपाशी दोन्ही पिकांचे नुकसान झाले. आता ना भाव आहे, ना उत्पादन. प्रशासनाने मदत केली नाही तर शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार.- बाळासाहेब सोनपसारे, शेतकरी

बाजारात भाव नाही, आणि पिकं कमी आली. खर्च भागवणंही कठीण झालंय. सरकारने मदत केली नाही तर पुढचे पीक घेणे अवघड होईल.- जनार्दन खामकर, शेतकरी

बाजारात भाव घटले

परतूर तालुक्यात काही ठिकाणी सोयाबीनची सोंगणी सुरू झाली असली तरी बाजारात दर हमीभावापेक्षा कमीच मिळत आहेत.सध्याचे दर ४ हजार ८०० ते ५ हजार २०० प्रति क्विंटलच्या दरम्यान असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे उत्पादन घट + कमी भाव = आर्थिक संकट हे समीकरण तयार झाले आहे.

पावसाने दिली थोडीफार उघडीप, पण शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे

गेल्या काही दिवसांत हवामानात थोडाफार बदल झाला असून पाऊस थांबला आहे. त्यामुळे शेतकरी यंत्राद्वारे काढणी व मळणी करत आहेत. मात्र, अनेकांना वाटतंय की, उत्पादन आणि भाव दोन्ही कमी, तर मेहनत कोणासाठी?

शेतकऱ्यांची मागणी

प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करावी.

बाजारात हमीभावाची खात्री देण्यात यावी.

कर्जमाफी आणि नव्या बियाण्यांसाठी अनुदान देण्यात यावे.

काढणी आणि साठवणीसाठी शेतकरी गटांना यांत्रिक साधनांची मदत मिळावी.

परतूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हा खरीप हंगाम तुफान संघर्षाचा ठरला आहे. पावसाने पिके घेतली, बाजाराने भाव घेतला, आणि सरकारकडे आशेचा हात पुढे करणारा शेतकरी आज पुन्हा एकदा संकटाच्या वर्तुळात सापडला आहे. आता फक्त सरकारकडून त्वरित मदत आणि योग्य भावाची हमी मिळाल्यासच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर थोडे समाधान दिसू  शकते.

हे ही वाचा सविस्तर : Mission Ubhari : शेतकरी कुटुंबांच्या 'उभारी' साठी यवतमाळ प्रशासनाचा संवेदनशील उपक्रम वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Marathwada Farmers Face Soybean Harvest Woes Due to Excessive Rain

Web Summary : Excessive rain in Parthur, Marathwada, devastated soybean crops, leaving farmers with low yields. Production costs exceed returns, pushing farmers into financial distress. Government aid is urgently needed.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीसोयाबीनकाढणीखरीप