Join us
Daily Top 2Weekly Top 5

Soybean AI Farming : धाराशिवमध्ये स्मार्ट शेतीचा प्रयोग; AI मुळे सोयाबीनचे उत्पन्न वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 13:21 IST

Soybean AI Farming : धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन शेतीत प्रथमच एआय  तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करण्यात आला असून, या प्रयोगामुळे उत्पादनात २४ टक्क्यांची वाढ झाली आहे. आयआयटी, मुंबई आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ  यांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे स्मार्ट शेती, डिजिटल फार्मिंग आणि प्रिसिजन अ‍ॅग्रीकल्चर या संकल्पनांना मोठा चालना मिळाली आहे. (Soybean AI Farming)

चेतन धनुरे

धाराशिव : कोरडवाहू शेतीतही आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळत असल्याचे चित्र समोर आले असून, सोयाबीन पिकात एआय (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनात तब्बल २४ टक्क्यांनी वाढ झाल्याचा यशस्वी प्रयोग धाराशिव जिल्ह्यात राबविण्यात आला आहे.

राज्यातील हा पहिलाच प्रयोग ठरला असून, भविष्यात सोयाबीन उत्पादकांसाठी गेमचेंजर ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कृषी विभागाने आयआयटी, मुंबई (IIT Bombay) आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth) यांच्या सहकार्याने हा प्रायोगिक प्रकल्प राबविला. उपळा गावात २० शेतकऱ्यांच्या २० एकर क्षेत्रावर हा प्रयोग करण्यात आला.

अतिवृष्टीतही उत्पादन वाढ

धाराशिव हा अवर्षणप्रवण जिल्हा असला तरी मागील खरीप हंगामात पावसाने विक्रमी हजेरी लावली. सरासरी ६०४ मिमी पावसाच्या तुलनेत जून ते सप्टेंबरदरम्यान तब्बल १००० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला.

या प्रतिकूल परिस्थितीतही एआयच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या व्यवस्थापनामुळे एकरी सरासरी दीड ते २ क्विंटलपर्यंत उत्पादनवाढ नोंदवली गेली.

'एआय'चा वापर कसा झाला?

* या प्रयोगात अत्याधुनिक सेन्सर आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.

* पिकाला आवश्यक पाण्याची अचूक गरज सेन्सरद्वारे मोजून शेतकऱ्यांच्या मोबाईलवर माहिती पाठवण्यात आली.

* ऑटोमॅटिक स्विचद्वारे गरजेनुसार पाणी देणे आणि थांबवणे शक्य झाले.

* हवामानाचा अंदाज देऊन सिंचनाचे नियोजन करण्यात आले.

* खत व्यवस्थापन आणि रोगनियंत्रणासाठी योग्य वेळेबाबत सूचना देण्यात आल्या.

* या सर्वामुळे पिकाचे व्यवस्थापन अधिक अचूक आणि शास्त्रीय पद्धतीने झाले.

सोयाबीन क्षेत्र मोठे, आव्हानेही मोठी

धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगामात सुमारे साडेपाच लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड होते, त्यापैकी साडेचार ते पावणेपाच लाख हेक्टर क्षेत्र सोयाबीनखाली आहे.

मागील काही वर्षांत अतिवृष्टी, खंड, रोगराई यामुळे उत्पादनावर परिणाम झाला होता. त्यामुळे उत्पादकता वाढवणे हे कृषी विभागासमोरील मोठे आव्हान होते.

जिल्हा नियोजन निधीतून प्रयोग

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून या प्रयोगाची अंमलबजावणी करण्यात आली. प्रयोग यशस्वी ठरल्याने भविष्यात अधिक शेतकऱ्यांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचवण्याचा कृषी विभागाचा मानस आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांनी दिली.

सोयाबीनसारख्या कोरडवाहू पिकात 'एआय' तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर हा शेती क्षेत्रासाठी मोठा टप्पा ठरत आहे.

हवामानातील अनिश्चिततेला तोंड देताना अचूक निर्णय घेण्यासाठी हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी भविष्यात अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

हे ही वाचा सविस्तर : AI Mango Farming : 'फळांचा राजा' झाला स्मार्ट; एआयमुळे आंबा शेतीत क्रांती वाचा सविस्तर

अधिक वाचा : AI Farming : परंपरेला टेक्नॉलॉजीची जोड; 'एआय' गुढीने वेधलं सगळ्यांचं लक्ष

English
हिंदी सारांश
Web Title : AI Boosts Soybean Yields in Dharashiv: Smart Farming Success

Web Summary : Dharashiv farmers saw a 24% soybean yield increase using AI. IIT Bombay and Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth collaborated on the pilot project. Sensors monitored water needs, optimizing irrigation and fertilization. This AI-driven approach offers solutions for rain-dependent agriculture, improving productivity despite weather challenges.
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनशेतकरीशेतीधाराशिवकृषी विज्ञान केंद्र